Advertisement

देशपांडेवरील हल्लाप्रकरणी आदित्य ठाकरे, संजय राऊतांना ताब्यात घ्या : अमेय खोपकर

मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी एक गंभीर आरोप केला आहे.

देशपांडेवरील हल्लाप्रकरणी आदित्य ठाकरे, संजय राऊतांना ताब्यात घ्या : अमेय खोपकर
SHARES

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबईतील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. संदीप देशपांडे शुक्रवारी सकाळी शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना त्यांच्यावर एका टोळक्याने हल्ला केला.

यावर मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी एक गंभीर आरोप केला आहे. संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यामागे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचा हात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे मुंबई पोलिसांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी, अशी मागणी अमेय खोपकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची चौकशी केल्यानंतर त्यामध्ये जर काही तथ्य निघालं तर त्यांना अटक करण्यात यावी, असेही खोपकर यांनी म्हटले.

संदीप देशपांडे हे मुंबई महापालिकेचे भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत. याच कारणामुळे त्यांच्यावर हल्ला झाला असण्याची शक्यता आहे. संदीप देशपांडे गप्प बसणारा माणूस नाही. मुंबई पोलीस आणि प्रशासनाने संदीप देशपांडे यांना योग्य ती सुरक्षा पुरवावी. पण त्यापूर्वी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी. हल्ल्याच्या कटात त्यांचा सहभाग असल्याचे आढळले तर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना अटक करावी, असेही खोपकर यांनी सांगितले.

संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना तात्काळ हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यांच्या हात आणि पायाला दुखापत झाली होती. आज सकाळपासून त्यांच्यावर डॉक्टर उपचार करत होते.

संदीप देशपांडे यांना भेटण्यासाठी हिंदुजा रुग्णालयात नेत्यांची रीघ लागली होती. हल्ल्याची बातमी समजताच मनसेचे स्थानिक नेते तातडीने हिंदुजा रुग्णालयात गेले. यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे आणि अमित ठाकरेही रुग्णालयात आले, त्यांनी संदीप देशपांडे यांची विचारपूस केली.

हिंदुजा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर संदीप देशपांडे यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणात आता पोलीस प्रशासन काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.

संदीप देशपांडे यांनी हिंदुजा रुग्णालयातून निघताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, मी कोणत्याही परिस्थितीत घाबरणार नाही. हल्ला करुन मी शांत बसेन, असे वाटत असेल तर तो गैरसमज आहे. मी घाबरणार नाही. माझ्यावरील हल्ल्यामागे कोण आहे, हे सर्वांना माहिती आहे, असे सूचक वक्तव्य संदीप देशपांडे यांनी केले.



हेही वाचा

Exclusive : मनसे नेते संदीप देशपांडेंच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट

नागालँड निवडणूक 2023 : रामदास आठवलेंच्या RPIने जिंकल्या 2 जागा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा