दमानिया 'मातोश्री'च्या दारी!

 Kalanagar
दमानिया 'मातोश्री'च्या दारी!

मुंबई - एरवी शिवसेनेच्या विचारधारेशी फटकून वागणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या 'मातोश्री' निवासस्थानावर भेट घेतली. या भेटीत त्यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्याविरोधातले काही गंभीर मुद्दे शिवसेना पक्षप्रमुखांच्या कानावर घातले. निमित्त होतं, मुंबईतल्या खंबाटा एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांची थकित देणी देण्याचं. कंपनी व्यवस्थापनानं गेले दहा महिने पगार थकवल्याबद्दल त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागितली.

गेली 3 वर्ष कर्मचा-यांच्या बोनस आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कमही थकवण्यात आल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. विशेष म्हणजे शिवसेना खासदार विनायक राऊत यांचं कंपनी व्यवस्थापनाशी साटंलोटं असून स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी राऊत यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची देणी थकवू दिल्याचे कथित पुरावे कर्मचारी प्रतिनिधींना घेऊन उद्धवभेटीला आलेल्या दमानिया यांनी सादर केले. उद्धव ठाकरे या प्रकरणी खंबाटा व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींची येत्या 5 जानेवारीला भेट घेऊन कंपनीच्या 2100 कर्मचाऱ्यांची थकवलेली देणी फेडण्याची मागणी करणार आहेत. या बैठकीला अंजली दमानिया यांच्यासह खासदार विनायक राऊत, खंबाटा कंपनीचे मालक गौरव भाटिया, कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक आणि कंपनीचे तक्रारदार कर्मचारीही उपस्थित राहणार आहेत.

Loading Comments