Advertisement

नाहीतर महाराष्ट्रात खराखुरा कर्फ्यू लागू करा, मनसेची मागणी

गर्दी कमी न झाल्यास महाराष्ट्रात सरकारी कर्फ्यू (Curfew in maharashtra) जाहीर करण्याची विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्य सरकारला करण्यात आली आहे.

नाहीतर महाराष्ट्रात खराखुरा कर्फ्यू लागू करा, मनसेची मागणी
SHARES

महाराष्ट्रातील कोरोनाबाधीत रुग्णांची (Coronavirus) संख्या ५२ वर जाऊन पोहोचली आहे. सध्या फेज २ मध्ये असलेला कोरोना व्हायरस समाजात घुसून हाहाकार माजवू नये म्हणून सरकारी पातळीवरून हरतऱ्हेची दक्षता घेण्यात येत आहे. तरीही गर्दी कमी न झाल्यास महाराष्ट्रात सरकारी कर्फ्यू (Curfew in  maharashtra) जाहीर करण्याची विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्य सरकारला करण्यात आली आहे. 

गर्दीमुळे कोरोनाचा (COVID-19) प्रसार होऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी गुरूवारी थेट जनतेशी संवाद साधून रविवार २२ मार्च रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंत स्वयंस्फूर्तीने ‘जनता कर्फ्यू’ (janta Curfew) पाळण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या पाठोपाठ राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कडक उपाययोजना जाहीर करत महामुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर अशी ४ शहरं ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. या काळात केवळ रेल्वे, बस आणि बँकांसारख्या अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहेत. 

 हेही वाचा - कोरोनाच्या संकटाला कसं तोंड द्यायचं? राज ठाकरेंनी सांगितला उपाय

सरकारने गर्दी टाळण्यासाठी सर्व खासगी कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्राॅम होम (work from home) देण्याचं किंवा ती सोय नसेल तर कंपनी थेट बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसंच सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती देखील ५० टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर आणण्यात आली आहे. अशा स्थितीत ट्रेन, बस, बाजारपेठांमध्ये गर्दी होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त करताना, गर्दी झालीच तर सार्वजनिक सेवा बंद करण्याचा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागेल, असा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी दिला आहे. 

सध्या राज्यात कोरोना फेज २ मध्ये असल्याने अनेकांना या व्हायरसचं गांभीर्य जाणवत नसल्याने ते सरकारचे नियम धुडकावून लावत आहेत. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील (MNS MLA raju patil) यांनी सोशल मीडियावरून भाष्य केलं आहे. 

आपल्या ट्विटर हँडलवरील ट्विटमध्ये राजू पाटील म्हणाले, "महाराष्ट्राची इटली होऊ द्यायची नसेल,आणि जर जनतेला केलेले 'स्वयंशिस्ती'चे आवाहन काम करणार नसेल तर सरकारला कठोर निर्णय घ्यावेच लागतील. गरज पडल्यास संपूर्ण राज्यात 'सरकारी कर्फ्यू' जाहीर करावा."

असं आवाहन राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना उद्देशून केलं आहे. 

 हेही वाचा - पंतप्रधानांच्या ‘जनता कर्फ्यू’ला १०० टक्के प्रतिसाद देणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे

दरम्यान, याआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यध्य राज ठाकरे (raj thackeray) यांनी देखील सोशल मीडियाद्वारे महाराष्ट्र सैनिकांना कोरोनाबाबत विविध सूचना दिल्या. यामध्ये राज ठाकरे म्हणाले की, आतापर्यंत आपण कोरोनाला जास्त फैलावू न देण्यात यशस्वी झालो आहोत. कोरोना एकमेकांच्या सहवासातून होतो. म्हणून आपण जर कमी वेळा एकमेकांच्या जवळ गेलो आणि हे सुमारे दोन आठवडे केले तर हा रोग पसरणार नाही असं राज ठाकरेंनी सांगितलं.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा