SHARE

मुंबई - शिवसेना-भाजपाची युती तुटल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी गुरुवारी जाहीर केलं. यावर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. तर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंच्या युती तोडण्याच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी युती तोडण्याच्या वल्गना करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडावे.

राज्याच्या इतिहासातील सर्वात अपारदर्शक सरकार चालवणारे पारदर्शकतेच्या गप्पा मारत आहेत. निवडणुकीची गणिते जुळत नाहीत म्हणून वेगवेगळ्या निवडणुका लढवायच्या आणि निवडणुकीतनंतर भ्रष्टाचार करण्यासाठी पुन्हा एकत्र यायचे ही शिवसेना भाजपाची कार्यपद्धती असल्याचं म्हणत त्यांनी भाजपा-शिवसेनेवर टीकेची झो़ड उठवली. विधानसभा आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षाच्या युतीनाट्याचे प्रयोग राज्यातील जनतेने पाहिले आहेत. मुंबई महापालिकेत गेल्या 22 वर्षात शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी प्रचंड भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत युती तोडून तो झाकला जाणार नसल्याचं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं. राज्य सरकारमधील विविध मंत्र्यांचे घोटाळे बाहेर आले असून शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष या भ्रष्टाचारात सामील असल्याचे समोर आले आहे, जनतेमध्ये शिवसेना भाजपा विरोधात तीव्र असंतोष असून आगामी निवडणुकांत काँग्रेसचा विजय सुकर झाला आहे, असेही चव्हाण यावेळी म्हणाले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या