विदर्भवाद्यांवर मनसेचा हल्लाबोल

Pali Hill
विदर्भवाद्यांवर मनसेचा हल्लाबोल
विदर्भवाद्यांवर मनसेचा हल्लाबोल
See all
मुंबई  -  

मुंबई - विदर्भ राज्य समितीने आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जयजयकार करत आणि हातात मनेसेचे झेंडे घेऊन परिषदेत शिरलेल्या या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आयोजित करण्यात आलेली ही पत्रकार परिषद उधळण्याचा प्रयत्न केला.

स्वतंत्र विदर्भाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुंबईतील प्रेस क्लबमध्ये ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी बोलण्यास सुरुवात करताच मनसे नेते अमेय खोपकर, मुंबई महापालिकेतील मनसे गटनेते संदीप देशपांडे, नगरसेवक संतोष धुरी आणि शाखाध्यक्ष शशांक नागवेकर यांनी जोरदार घोषणाबाजी करत व्यासपीठाकडे धाव घेतली. 
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार वामनराव चटप, अॅड.नंदा पराते, रमेशकुमार गजबे, डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांना घेराव घालत मनसे कार्यकर्त्यांनी 'फुटीरतावाद्यांनो चालते व्हा,' असे दरडावत पत्रकार परिषदेत धिंगाणा घातला. या इशाऱ्याला विदर्भवाद्यांनी न जुमानल्यामुळे संतापलेल्या मनसैनिकांनी टेबल व खुर्च्यांची खेचाखेची केली. सुमारे दहा मिनिटे हा गोंधळ सुरू होता. अखेरीस पोलीसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वातावरण निवळले. 
'भाजपने सत्तेवर येण्यापूर्वी स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन दिले होते. पण सत्ता मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना या आश्वासनाचा विसर पडला आहे. मात्र, आता शेंडी तुटो वा पारंबी. आम्ही मागे हटणार नाही. 3 आणि 4 ऑक्टोबर रोजी नागपुरात स्वतंत्र विदर्भाची प्रतिरूप विधानसभा आयोजित करणार आहोत. 5 डिसेंबर रोजी जनजागृती दिंडी आणि 31 डिसेंबर रोजी सरकारला अंतिम इशारा देणार आहोत,' अशी माहिती चटप यांनी दिली.

 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.