Advertisement

अॅड. चंद्रशेखर आझाद मुंबईत देणार 'भाजपा हटाव'चा नारा

दीड-दोन महिन्यांपूर्वीच चंद्रशेखर आझाद यांची उत्तर प्रदेशातील तुरूंगामधून सुटका झाली आहे. योगी सरकारने त्यांच्यावर रासुका लावत त्यांना अटक केली होती. तब्बल १६ महिने ते तुरूंगात होते. तुरुंगातून सुटका झाल्याबरोबर त्यांनी 'भाजपा हटाव संविधान बचाव, देश बचाव' हाच आपला नारा आणि पुढचं उद्दीष्ट असल्याचं जाहीर केलं

अॅड. चंद्रशेखर आझाद मुंबईत देणार 'भाजपा हटाव'चा नारा
SHARES

भीम आर्मीचा संस्थापक अॅड. चंद्रशेखर आझाद यांची तोफ लवकरच मुंबईत धडाडणार आहे. 'भाजपा हटाओ संविधान बचावो', असा नारा देत चंद्रशेखर आझादने देश पिंजून काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून चंद्रशेखर आझाद महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. २९ डिसेंबर ते ४ जानेवारी असा हा दौरा असणार असून मुंबई, पुणे, लातूर आणि अमरावती इथं त्यांच्या जाहीर सभा होणार असल्याची माहिती भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे यांनी दिली आहे.


तुरूंगातून सुटका

दीड-दोन महिन्यांपूर्वीच चंद्रशेखर आझाद यांची उत्तर प्रदेशातील तुरूंगामधून सुटका झाली आहे. योगी सरकारने त्यांच्यावर रासुका लावत त्यांना अटक केली होती. तब्बल १६ महिने ते तुरूंगात होते. तुरुंगातून सुटका झाल्याबरोबर त्यांनी 'भाजपा हटाव संविधान बचाव, देश बचाव' हाच आपला नारा आणि पुढचं उद्दीष्ट असल्याचं जाहीर केलं.


तरूणांचं आकर्षण

गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी आणि चंद्रशेखर आझाद यांच्याकडे तरूण दलित नेतृत्व म्हणून पाहिलं जात आहे. त्यांच्या भाषणाकडे दलित तरूण मोठ्या संख्येनं आकर्षित होताना दिसत आहेत. त्यातच भाजपाचं ३ राज्यात पानीपत झाल्यानंतर लागलीच 'भाजपा हटावचा नारा' देत चंद्रशेखर आझाद मुंबईत तरूणांना संबोधित करणार असल्याने या सभेकडे सर्वाचंच लक्ष लागणार असल्याचंही कांबळे यांनी म्हटलं आहे.


'असा' असेल दौरा

आझाद २८ डिसेंबरला मुंबईत दाखल होणार असून २९ डिसेंबरला आधी चैत्यभूमी दादर येथे जाऊन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवाद करणार आहेत. त्यानंतर ४ वाजता वरळीतील जांबोरी मैदान इथं त्यांची जाहीर सभा होणार आहे. ३० डिसेंबरला पुण्यात भीमा कोरेगाव क्रांती सभेत त्यांचं भाषण होणार असून ३१ डिसेंबरला भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आझाद जाणार आहेत. त्यानंतर २ जानेवारीला लातूर इथं तर ४ जानेवारीला अमरावती इथं त्यांची सभा होणार असल्याचंही कांबळे यांनी सांगितलं.



हेही वाचा-

काँग्रेसला पलटवार देण्यासाठी भाजपाच्या देशभरात ७० पत्रकार परिषदा- निर्मला सीतारमन

राफेलप्रकरणी केंद्राने न्यायालयाला चुकीची माहिती दिली- पवार



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा