Advertisement

मंदिरे उघडण्यासाठी राज्यव्यापी शंखनाद, भाजपने दिला पाठिंबा

भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे ३० आॅगस्ट सकाळी ११ वाजता राज्यव्यापी शंखनाद आयोजन करण्यात येणार आहे.

मंदिरे उघडण्यासाठी राज्यव्यापी शंखनाद, भाजपने दिला पाठिंबा
SHARES

कोरोना विषाणू प्रादुर्भाच्या कारणाखाली बंद ठेवण्यात आलेली राज्यातील सर्व मंदिरे उघडण्यात यावी या मागणीसाठी भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे ३० आॅगस्ट सकाळी ११ वाजता राज्यव्यापी शंखनाद आयोजन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला भाजपने पाठिंबा जाहीर केला आहे.

श्रीकृष्ण जयंती आणि चौथ्या श्रावणी सोमवारच्या मुहूर्तावर हा राज्यव्यापी शंखनाद करणार असल्याची घोषणा आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे. या आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावं, अशी सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे.

यासंदर्भात भाजपकडून एक पत्रक जारी करण्यात आलं आहे. यांत नमूद केल्यानुसार ठाकरे सरकारने ५ महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुन्हा बंद करून ठेवली आहेत. आता सर्व व्यवहार सुरळीत केले असताना फक्त मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. मंदिरांवर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उपजिवीकेवर गदा आल्याने त्यांची उपासमार होत आहे. त्यांना राज्य सरकार कोणतीही आर्थिक मदत देत नाही आणि दुसरीकडे मंदिरेही उघडली जात नाहीत.

देशातील अन्य राज्यांत मात्र मंदिरे सुरू आहेत. म्हणूनच देव-धर्मावर सातत्याने अन्याय करणाऱ्या देवी-देवतांना बंदिस्त करून लाखो गरीबांची उपासमार करणाऱ्या ठाकरे सरकारला मंदिरे खुली करण्याचा इशारा देण्यासाठी श्रीकृष्ण जयंती आणि चौथ्या श्रावणी सोमवारच्या मुहूर्तावर भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे शंखनाद आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनाला भाजपचा पूर्णपणे पाठिंबा असून पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सक्रीय सहभागी व्हावं. आपल्या परिसरातील प्रमुख मंदिरे तसंच धार्मिक स्थळांसमोर टाळ, घंटा व शंख वाजवून आंदोलन करावं, अशी सूचना भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा