Advertisement

नालासोपाऱ्यात झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण?, भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल

नालासोपाऱ्यात झालेल्या मृत्यूला कोण जबाबदार? असा प्रश्न भाजपने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.

नालासोपाऱ्यात झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण?, भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल
SHARES

वसई-विरार शहरात सोमवारी तब्बल ११ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे यातील काही रुग्ण ऑक्सिजन न मिळाल्याने दगावल्याचा आरोप या रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णालयात नालासोपाऱ्यातील ७ रुग्णांचा समावेश आहे. त्यावर भाष्य करताना नालासोपाऱ्यात झालेल्या मृत्यूला कोण जबाबदार? असा प्रश्न भाजपने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.

प्रभावी योजनांच्या अभावाची तिघाडी, ठाकरे साहेब केवळ तुमच्या निष्क्रियतेचे आणखी १२ बळी, किती लोकांचा जीव तुमची व्यवस्था घेणार? असा प्रश्न भाजपने ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारला विचारला आहे. राज्याचे अर्थचक्र आणि हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांसाठी लॉकडाऊन हा पर्याय नेहमी असू शकत नाही हे ठाकरे सरकारने लक्षात घ्यावे. त्यापेक्षा सरकारने कोरोनाचे नियम आणखी कठोर करून आरोग्य सुविधा वाढवाव्या, असा टोलाही लाॅकडाऊनवरून लगावला आहे.

हेही वाचा- धक्कादायक, नालासोपारात ऑक्सिजन न मिळाल्याने १० रूग्णांचा मृत्यू

राज्यात मागील काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या बहुतांश रुग्णालयातील खाटा भरलेल्या आहेत. काही ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडाही जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची अक्षरश: धावपळ सुरू आहे, तर काही ठिकाणी रुग्णांच्या जीवावर बेतण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

त्यातच नालासोपाऱ्यातील विनायक रुग्णालय आणि रिद्धीविनायक रुग्णालयात काही कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. दोन्ही रुग्णालयात मिळून १० रुग्ण दगावल्याचं सांगण्यात येत आहे. कोरोनामुळे प्रकृती खालावत जाऊनही वेळेत आॅक्सिजन न मिळाल्याने या रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा रुग्णांच्या नातेवाईकांनी केला. 

ही बाब पसरताच रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. परंतु तुळींज पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ही गर्दी हटवली. रुग्णालयात दुपारच्या सुमारास आॅक्सिजन पुरवठा करण्यात आल्याची खात्री केली असून रुग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारी नोंदवण्यात येतील, असं पोलिसांनी स्पष्ट केलं.

(bjp blames thackeray government for covid 19 patients deaths in nalasopara hospital)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा