कांदिवली - कांदिवली हनुमाननगर लोकमान्य चाळ नंबर 2 वॉर्ड क्रमांक 28 मध्ये भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केलं असल्याचं समोर आलंय. शनिवारी लोकमान्य चाळीत विजेचे खांब लावण्यावरुन विरोधी मतदारांनी गोंधळ घातला. या प्रकारानंतर पोलीस आणि निवडणूक अधिकारी यांना कळवण्यात आलं. पण, काहीच कारवाई केली गेली नाही. तसंच या विषयी स्थानिकांना विचारलं असता मत मागण्यासाठी हे विजेचे खांब लावण्यात आल्याचं सांगितलं. महानगरपालिका उपायुक्त रावसाहेब गायकवाड यांना या विषयी विचारलं असता त्यांनी हे विजेचे खांब जुने असल्याचं सांगितलं. त्यानंतर नवीन लावण्यात आलेल्या विजेचा खांबांचा फोटो त्यांना दाखवण्यात आला. तेव्हा त्यांनी याप्रकरणी विचारपूस करुन कारवाई केली जाईल असं सांगितलं.