भाजपाचा प्रचाराचा नारळ रविवारी फुटणार

 Dadar
भाजपाचा प्रचाराचा नारळ रविवारी फुटणार

मुंबई - भाजपाचे सर्व उमेदवार रविवारी दुपारी 2 वाजता हुतात्मा चौकातील स्मारकाला अभिवादन करून त्यानंतर होणाऱ्या मेळाव्यात पारदर्शी भ्रष्टाचारमुक्त कारभाराची शपथ घेणार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याहस्ते रविवारी प्रचाराचा नारळ फुटणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ज्या भागात निवडणूका आहेत त्या भागातील सर्व जनतेला भाजपच्या जाहिरनाम्याबाबात आपल्या अपेक्षा आणि सुचना पाठवा असे आवाहन सोशल मीडियावरून केले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, सुमारे सहा लाखाहून अधिक सुचना आल्या आहेत. त्या सर्व सुचनांचा विचार करून भाजपाचा जाहिरनामा तयार करण्यात येणार असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील निवडणूक क्षेत्रातील जनतेशी ऑनलाईन संवाद साधून त्यांच्या अपेक्षा आणि सुचना जाणून घेणार आहेत. त्यांचा भाजपाच्या जाहिरनाम्यात समावेश केला जाणार आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट येथे उमेदवारांचा मेळावा रविवारी होणार असून, या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उमेदवारांना संबोधित करणार आहेत. त्यानंतर या कार्यक्रमातच मुंबईकरांना पारदर्शी आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार याची शपथ देण्यात येणार आहे.

दरम्यान मुंबई भाजपाचे अध्‍यक्ष आमदार आशिष शेलार यांनी काही जणांनी स्वयंघोषित प्रचाराला सुरूवात केली. तर काही जणांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा विसर पडला. काहीजण छत्रपती शिवाजी महाराजांनाही अभिवादन करायला विसरले. भाजपा मात्र हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून मुंबईकरांना पारदर्शी आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार देण्याची शपथ घेऊन आपल्या प्रचाराला सुरूवात करणार असल्याचे सांगत शिवसेनला टार्गेट केले.

Loading Comments