Advertisement

बघा तो व्हिडिओ... 'खोटं बोल पण, रेटून बोल म्हणजे राज ठाकरे' - आशिष शेलार

राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांची उत्तर त्यांच्याच स्टाईलनं देण्याचा निर्णय भाजपनं घेतला होता. त्यानुसार वांद्रयाच्या रंगशारदा सभागृहात शनिवारी सकाळी भाजपनं सभा झाली. या सभेमध्ये मनसेच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ला भाजपाकडून ‘बघाच तो व्हिडिओ’च्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले जात आहे.

बघा तो व्हिडिओ... 'खोटं बोल पण, रेटून बोल म्हणजे राज ठाकरे' - आशिष शेलार
SHARES

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या सर्व सभांमध्ये मोदी व शाह यांच्याविरोधात प्रचार केला आहे. तसंच, 'लाव रे तो व्हिडिओ' असं म्हणत व्हिडिओ दाखवत भाजप सरकारची पोलखोल केली. त्यामुळे राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांना त्यांच्याच स्टाईलनं देण्याचा निर्णय भाजपनं घेतला. त्यानुसार वांद्रयाच्या रंगशारदा सभागृहात शनिवारी सकाळी भाजपनं ‘बघाच तो व्हिडिओ’च्या माध्यमातून मनसेला प्रत्युत्तर दिलं.


'३२ वेगवेगळे आरोप'

या सभेमध्ये राज ठाकरे यांनी केलेल्या ३२ पैकी १९ आरोपांची पोलखोल भाजपचे प्रवक्ते आशिष शेलार यांनी केली. असत्य आणि अर्धवट गोष्टींवर राजकारण करण्याची राज ठाकरे यांची प्रवृत्ती आहे. 'खोटं बोल, पण रेटून बोल म्हणजे राज ठाकरे' अशी टीका यावेळी आशिष शेलार यांनी केली. तसंच, आशिष शेलार हे राज ठाकरेंचे जवळचे मित्र असल्यामुळं त्यांनी या सभेमध्ये 'मित्रा तू खरंच चुकलास' असं म्हटलं.


'पवारांचा व्हिडिओ'

राज ठाकरे यापूर्वी राहुल गांधी, अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्याबद्दल काय बोललो होते. त्यांच्यावर कशी टीका केली होती. ते राज ठाकरे यांचे जुने व्हिडिओ शेलार यांनी यावेळी दाखवले. तसंच, तेव्हा केलेली टीकाही दाखवली. राष्ट्रवादीच्या नेत्यांची राज ठाकरे यांनी केलेली मिमिक्रीही दाखवण्यात आली.


पळता भुई थोडी होईल 

'तुम्ही मोदींना प्रश्न विचारताय, त्या पक्षाचे महाराष्ट्रात खासदार २२, आमदार १२२, महापौर १६, नगरसेवकांसाठी २ सभागृहे लागतील, एवढी संख्या आहे. सरपंचांची आकडेवारी सांगितली, तर राज ठाकरेंची पळता भुई थोडी होईल' असा टोला देखील शेलार यांनी लगावला. 


'जनतेच्या डोळ्यात धूळफेक'

'अकाऊंट व्हेरीफाईड नाही, सोर्स व्हेरिफाईड नाही, भाजपाशी संबंध नाही अशा व्यक्तींचा पोस्ट दाखवल्या जातात. आमचं नाणं शंभर टक्के खरं, मोदींनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळची गर्दी पाहा. आमचा संबंध नसलेल्या अकाऊंट वरून आमची बदनामी करता पण यातून तुम्ही जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहात’, अशी टीकाही त्यांनी केली. 


'मोदींच्या गावावर टीका' 

राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या दत्तक गावावर टीका केली. यावर आशिष शेलार यांनी मोदींनी दत्तक घेतलेल्या गावाचा व्हिडिओ दाखवून सत्य दाखविलं. तसंच, तुम्ही करताय तो विपर्यास, आमचे खासदार करतात तो प्रयास, अशी टीका केली. ज्या माणसानं एक पार्कही दत्तक घेतलं नाही ते गाव काय दत्तक घेणार, असा उपरोधिक सवालही त्यांनी उपस्थित केला.


'नोटाबंदीचा घोटाळा'

राज ठाकरेंच्या नोटाबंदीतील घोटाळ्याच्या आरोपावरही शेलार यांनी पुरावे दिले. नोटाबंदी हा एका रात्रीत आलेला निर्णय नाही, काळा पैसा बँकेत जमा करा, कर भरा असं आवाहन आधी करण्यात आलं होतं. सरकारनं जनतेशी संवाद साधाला. काळ्या पैशावर प्रहार करणं हे माझं कर्तव्य असं मोदींनी आधीचं संगितलं होतं. नोटाबंदीनंतर ३ लाख ३४ हजार बनावट कंपन्या बंद झाल्या मग हा घोटाळा आहे का ? नोटबंदी नंतर टॅक्सचं कलेक्शन हे ७ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत वाढलं. इनकम टॅक्स भरणारे ३ कोटी ८० लाख होते ते नोटबंदीनंतर ६ कोटी ८६ लाख झाले. घराच्या किंमती कमी झाल्या, असे देखील मुद्दे मांडले आहेत.

महाराष्ट्रातील बलात्काराच्या घटनांची आकडेवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडलेले भाषणही दाखविले. निर्भया प्रकरण, जनजागृतीमुळे बलात्काराच्या तक्रारींध्ये वाढ झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता. यानंतर तक्रारी वाढल्या, त्या महिलेला संरक्षण देणं सरकारचं काम आहे, असं शेलार यांनी म्हटलं.


'तुम्ही अर्धवट राव तर नाही ना' 

जवानांच्या नावांनी राजकारण करत आहेत, असा आरोप मोदींवर आहे. खरा प्रश्न आणि खरं उत्तर ऐका मग तुम्हालाही प्रश्न पडेल काय बोलतो हा माणूस? व्हेरिफाईड इंटरव्ह्यूमधून काही मिळत नाही व्हिडिओ अर्धवट कापला. रामदास पाध्येंच्या बोलक्या बाहुल्यांमधील तुम्ही अर्धवट राव तर नाही ना ? असा प्रश्न विचारत राज ठाकरे यांची खिल्ली उडविली.



हेही वाचा -

'असे' शोधा तुमच्या घराजवळील मतदान केंद्र

२० रूपयाची नवी नोट लवकरच चलनात



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा