Advertisement

Coronavirus in Dharavi: जो नेता घरातून बाहेरसुद्धा निघाला नाही, त्याला धारावीच्या यशाचं श्रेय का? - चंद्रकांत पाटील

जागतिक आरोग्य संघटने (WHO) ने धारावीच्या यशस्वी लढ्याची माहिती जगभर सांगितली, तेव्हा सरकारकडून ही अपेक्षा होती की त्यांनी प्रत्येक लहान-मोठा कार्यकर्ता आणि स्वयंसेवकांनाही त्याचं श्रेय द्यायला हवं होतं.

Coronavirus in Dharavi: जो नेता घरातून बाहेरसुद्धा निघाला नाही, त्याला धारावीच्या यशाचं श्रेय का? - चंद्रकांत पाटील
SHARES

जागतिक आरोग्य संघटने (WHO) ने धारावीच्या यशस्वी लढ्याची माहिती जगभर सांगितली, तेव्हा सरकारकडून ही अपेक्षा होती की त्यांनी प्रत्येक लहान-मोठा कार्यकर्ता आणि स्वयंसेवकांनाही त्याचं श्रेय द्यायला हवं होतं. अशा भयाण महामारीच्या संकटात या लहान विजयाचं श्रेयसुद्धा केवळ त्याच कोरोना योद्ध्यांना जातं. अशा कोणत्याही नेत्याला नाही, जो कोरोनाच्या काळात घरातून बाहेरसुद्धा निघाला नाही, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी श्रेयवादावरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपरोधिक टोला हाणला आहे. (bjp leader chandrakant patil criticised cm uddhav thackeray over covid 19 in dharavi slum)

जरा अतिरेकच

धारावीत जे कोरोनावर यश मिळालं ते फक्त संघ स्वयंसेवकांमुळेच, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यावर हा जरा अतिरेकच झाला. संघाचं काम चांगलं नाही असं कोणी म्हणणार नाही, पण धारावीतील कोरोना नियंत्रणाच्या कार्यात सर्वच यंत्रणांनी मेहनत घेतली आहे. हे यश सामुदायिक आहे, मात्र त्यातही मुंबई महापालिकेचं काम मोठं आहे हे तुम्ही मान्य करणार की नाही? दिल्ली, उत्तर प्रदेश, पुणे, पिंपरी-चिंचवड वगैरे भागांत स्वयंसेवकांचं अस्तित्व आहे, मग तिथं संघ धारावीप्रमाणे दक्ष का नाही? त्यामुळे संघाला कोरोना युद्धात उगाच ओढण्याचं कारण नाही, असं म्हणत शिवसेनेने चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केलं होतं. 

हेही वाचा- Covid-19 In Dharavi: धारावीत कोरोनावर यश संघ स्वयंसेवकांमुळेच? हा जरा अतिरेकच- शिवसेना 

कोरोना योद्धे

त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडून आता याच श्रेयवादावरून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्यात आलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून चंद्रकात पाटील म्हणतात की, कोरोना व्हायरसविरूद्धच्या या लढ्यात देशाच्या विभिन्न भागातून कोरोना योद्धे लढत आहेत. डाॅक्टर, पोलीस, सरकारी कर्मचारी आणि अधिकारी, जनप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थानं आणि कित्येक अगणित सामान्य माणसं जे आपल्या दृढ इच्छाशक्तीमुळे या लढाईत सामील झाले आहेत. 

धाडसाने काम

मुंबई, पुण्यातील लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या भागांमध्ये गेल्या ३ महिन्यांपासून अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन अत्यंत धाडसाने नागरिकांचं स्क्रिनिंग आणि टेस्टिंग केलं तसंच आयसोलेशनमध्ये सहकार्य केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह अनेक सामाजिक संघटना आणि रुग्णालयांनी जागरूकता निर्माण करण्याचे यशस्वी प्रयत्न केले. लोकांच्या मनातील कोरोनाच्या आजाराची भीती निघून जावो आणि त्यांनी सूचनांचं पालन करावं, हा एकच उद्देश समोर ठेवून ते कार्यरत होते.

विजयाचं श्रेय

आज जेव्हा जागतिक आरोग्य संघटने (WHO) ने धारावीच्या यशस्वी लढ्याची माहिती जगभर सांगितली, तेव्हा सरकारकडून ही अपेक्षा होती की त्यांनी प्रत्येक लहान-मोठा कार्यकर्ता आणि स्वयंसेवकांनाही त्याचं श्रेय द्यायला हवं होतं. अशा भयाण महामारीच्या संकटात या लहान विजयाचं श्रेयसुद्धा केवळ त्याच कोरोना योद्ध्यांना जातं. अशा कोणत्याही नेत्याला नाही, जो कोरोनाच्या काळात घरातून बाहेरसुद्धा निघाला नाही. बाकी धारावीची जनता हुशार आहे. कधी, कोणी, कोणाची, कशाप्रकारे मदत केली आहे, चिंता केली आहे, हे त्यांना निश्चितच माहीत आहे, असं म्हणत अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांवर पाटील यांनी टीका केली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा