Advertisement

किरीट सोमय्या यांची 'राज' की बात ...!

आले आले नाराज किरीट सोमय्या बाहेर आले आणि आम्हाला संगीत स्वयंवर मधला प्रख्यात संवाद आठवला. आम्ही आधीच सांगून ठेवतो, हा जो काही संवाद आहे तो आम्ही खूप ठिकाणी वापरणार आहोत. राजकारणात आले आणि गेले हेच चालू असते. त्यात आता तर निवडणूक म्हणजे बघायलाच नको.

किरीट सोमय्या यांची 'राज' की बात ...!
SHARES

आले आले नाराज किरीट सोमय्या बाहेर आले आणि आम्हाला संगीत स्वयंवर मधला प्रख्यात संवाद आठवला. आम्ही आधीच सांगून ठेवतो, हा जो काही संवाद आहे तो आम्ही खूप ठिकाणी वापरणार आहोत. राजकारणात आले आणि गेले हेच चालू असते. त्यात आता तर निवडणूक म्हणजे बघायलाच नको. किती आले किती गेले याचा पत्ता नाही लागणार. तर किरीट सोमय्या आले. या निवडणुकीत त्यांचं तिकीट कापल्याने ते खूप नाराज असतील. उद्धव ठाकरेंशी पंगा घेतल्याने म्हणे त्यांचा पत्ता कट झाला. खरं खोट देव जाणो नाहीतर भाजपचे वरिष्ठ जाणो. पण सोमय्यांवर अरिष्ट आलं खरं.

दोघांच्या भांडणात तिसऱ्याच लाभ होतो असं आपण ऐकत आलो आहोत. इथे मात्र गडबड झाली. सेना भाजपच्या भांडणात सोमय्यांनी उडी घेतली आणि तोंडावर आपटले. राजकारणात डेअरिंग करणारा पुढे जातो असं म्हणतात, पण आजच राजकारण खूपच पुढे गेलय. दुसऱ्या कुणाला पुढे करून कोण कधी तुमचा गेम करेल भरोसा नाही. सोमय्यांना वाटलं आपण उद्धव ठाकरे यांना नडलो तर पुढे जाऊ. पक्षात आपलं स्थान मोठं बळकट होईल. पण कसले काय. असो तर तिकीट कापल्या नंतर ते दोन तीन आठवडे गप्प होते. पण आले शेवटी बाहेर. आले ते थेट राज ठाकरेंवर चाल करून गेले ना.

एकेकाळी सोमय्या सतत हातात मेजर टेप घेऊन मापं काढताना दिसायचे. रस्त्यावर पडलेले खड्डे मोजायचे. म्हणजे खड्ड्यंचा आकार मोजायचे. त्याची लांबी रुंदी मोजायचे. मग फोटोग्राफरला पोझ द्यायचे. मध्यंतरी एक मोठी सर्वांच्याच मनाला चटका लावून जाणारी एक दुर्देवी घटना घडली. मोनिका मोरे तुम्हाला ठाऊक असेल. रेल्वे अपघातात तिचे दोन्ही हात कापले गेले. या अपघातानंतर सोमय्यांनी रेल्वेवर प्रश्नांचा भडीमार केला. फलाटांची उंची मोजायला सुरुवात केली. ते बऱ्याचदा रेल्वे फलाटावर दिसू लागले. तेही मेजर टेप घेऊन. ट्रॅकवर उतरून ते फलाटांची उंची मोजू लागले. इतकच काय तर आता त्यांनी राज ठाकरे यांची उंची दाखवली.

सोमय्या म्हणतात मोदी सरकारच्या काळात आम्ही ४२५ रेल्वे फलाटांची उंची वाढवली. पण राज ठाकरे यांची उंची कमी झालीय. असं ते म्हणतात. आता रेल्वे फलाटांची उंची आणि राज ठाकरे यांची उंची याचा संबंध काय? पुढे ते म्हणतात की २००९ साली जी त्यांची उंची होती ती आता जमिनीखाली गेलीय. म्हणजे काय बुवा? आमच्या टाळक्यात काही शिरले नाही. राज जमिनीखाली गेले असते तर त्यांच्या सभांना इतकी गर्दी कशी?

खरे तर हे मोजण्या मापण्याची सुरुवात भाजपने केली. ५६ इंच छाती पासून सुरु झाली. ५६ इंचापुढे त्यांनी दुसऱ्या कुणाला जाऊ दिले नाही. सत्तेवर आल्यावर तर ते किलोमीटरने मोजायला लागले. मुंबईपासून अमुक तमुक किलोमीटरपर्यंत काँग्रेसचा सुपडा साफ झाला. तसे मेसेज ते व्हायरल करायला लागले. म्हणून की काय आता सोमय्या राज ठाकरेंची उंची मोजू लागले. का तर राज यांनी परवाच्या सभेत मंचावर मोनिका मोरेला बोलावले म्हणून..!

मोनिका मोरे या मुलीला अपघात नंतर तिला स्वच्छ भारत अभियानाची ब्रँड अम्बॅसेडर केले होते. पण पुढे काय झाले? तिला नोकरीचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले? किरीट सोमय्याना कुणीतरी नोकरी संदर्भात प्रश्नही विचारला. पण सोमय्यांनी टाळाटाळ केली. त्यावर भाष्य केले नाही. पण राज ठाकरेंची त्यांना उंची दिसली. ते म्हणतात राज यांनी मोनिकाला मंचावर बोलवायला नको होते. आता काय झाले किरीटजीं ? तुम्हाला मंचाची उंची मोजायला तुमची टेप तोकडी पडली की काय . असो २३ मे च्या निकालानंतर कळेलच कोण किती उंच झाला नि कोण बुटका झाला. तुम्ही तुमची टेप जपून ठेवा. सोबत ठेवा.!

- शिवाजी मंदिरवाले




हेही वाचा -

इश्यू क्या है ? डम्पिंग ग्राऊंडमुळं रहिवासी पडताहेत आजारी, काय म्हणाले संजय दिना पाटील? बघा व्हिडिओ

इश्यू क्या है?: शिवसेना भाजपला मत मागण्याचा अधिकारचं द्यायला नको, काय म्हणाले निरूपम? बघा व्हिडिओ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा