भुज-बळासाठी भाजपाची व्यूहरचना?

 Pali Hill
भुज-बळासाठी भाजपाची व्यूहरचना?
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - बेहिशेबी संपत्ती बाळगल्याप्रकरणी तुरुंगवास भोगावा लागलेले आणि सध्या प्रकृती अस्वास्थ्याच्या 'निमित्ताने' बाँबे हॉस्पिटलमध्ये दाखल असलेले राज्याचे माजी उप मुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा रुग्णालयातला मुक्काम वाढवला जाणार आहे. भुजबळ सध्या जामिनाच्या प्रतिक्षेत आहेत. अनेक व्याधींनी ग्रस्त असल्याचं कारण पुढे करत त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी विशिष्ट रुग्णालयात दाखल करुन घ्यायचं. दरम्यान, नेटानं प्रयत्न करत त्यांच्यासाठी न्यायालयातून जामिन मिळवायचा, अशी व्यूहरचना आखण्यात आलीय. विशेष म्हणजे यासाठी प्रयत्न करणारे नेता भुजबळांच्या स्वपक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नाहीत तर भाजपाचे आहेत. मराठा समाजाच्या मूक मोर्चांना राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर राज्य सरकार सावध झालंय. कोणत्याही व्यक्तिविशेषाच्या नेतृत्वाशिवाय यशस्वी झालेल्या या मोर्चांची परिणामकता घटवण्यासाठी बहुजन समाजातून पर्यायी आणि सक्षम नेतृत्व नव्यानं पुढे आणण्याचा राजकीय डाव टाकला जाणार आहे. त्यासाठी ‘फायरब्रँड’ प्रतिमेच्या छगन भुजबळ यांचं राजकीय पुनर्वसन घडवणं गरजेचं आहे. अर्थातच हे काम टप्प्याटप्प्यानं होणार आहे. हीच शक्यता पडताळून पाहण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पाहण्यासाठी रुग्णालयात भुजबळ यांची सदिच्छा भेट घेतली होती, अशी माहिती भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली आहे.

Loading Comments