Advertisement

पक्ष वाढवायचा असेल तर.., चंद्रकांत पाटलांनी दिला राज ठाकरेंना ‘हा’ सल्ला

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्ष वाढवण्यासाठी राज ठाकरेंनी काय केलं पाहिजे, याबाबत महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

पक्ष वाढवायचा असेल तर.., चंद्रकांत पाटलांनी दिला राज ठाकरेंना ‘हा’ सल्ला
SHARES

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा झालेली असताना ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याससाठी तयारीनिशी सज्ज व्हा, असे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकारी आणि मनसैनिकांना दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप-मनसे युतीची चर्चा असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्ष वाढवण्यासाठी राज ठाकरेंनी (raj thackeray)काय केलं पाहिजे, याबाबत महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागातील सर्वच ग्रामपंचायतीत आपले उमदेवार उभे करावेत आणि त्यांना संपूर्ण ताकदीने निवडून आणवेत, असे निर्देश राज ठाकरे यांनी तमाम मनसे पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

त्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील (chandrakant patil) म्हणाले, राज ठाकरे यांना पक्ष वाढवायचा असेल, पक्ष संघटन मजबूत करायची असेल तर त्यांनी राज्यभर फिरायला हवं. आपण राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरलो, लोकांशी संवाद साधला तरच आपली ताकद किती आहे याचा अंदाज आपल्याला येतो. प्रत्येक निवडणूक लढल्याने आपल्याला नेमका किती जनाधार आहे, जनतेचा किती प्रतिसाद आहे, याचा अंदाज देखील येतो.

हेही वाचा- ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सज्ज व्हा! राज ठाकरेंचे आदेश

भाजप ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेसोबत युती करणार का? या प्रश्नावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं, एकवेळ महापालिका निवडणुकांमध्ये मनसेचा किती प्रभाव असेल, याचा अंदाज घेता येऊ शकतो. परंतु ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचा किती प्रभाव असेल, हे सांगता येणार नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप मनसेशी (bjp mns alliance) युती करणार नाही, हे स्पष्ट आहे. तर ही निवडणूक भाजप पूर्ण ताकदीने लढणार असून यासंदर्भात नुकतीच भाजप आमदारांची बैठक झाली आहे. या बैठकीत निवडणूक रणनितीच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत, असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रातील (maharashtra) ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान; तर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे.

या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे २३ ते ३० डिसेंबर २०२० या कालावधीत स्वीकारली जातील. शासकीय सुटीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी ३१ डिसेंबर २०२० रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे ४ जानेवारी २०२१ पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. तर मतमोजणी १८ जानेवारी २०२१ रोजी होईल. गडचिरोली जिल्ह्यात फक्त मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत असेल.

(bjp maharashtra president chandrakant patil advice mns chief raj thackeray over gram panchayat election 2021)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा