गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईच्या चाकरमान्यांसाठी ५ ऑगस्टपासून एसटी बस सोडणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड अनिल परब यांनी नुकतीच दिली. परंतु गणेशोत्सावाला अवघे काही दिवस उरलेले असताना परिवहन मंत्र्यांनी केलेली ही घोषणा म्हणजे वरातीमागून घोडं आहे. एवढंच नाही, तर ही कोकणी माणसाची फसवणूक असल्याची टीका भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. (bjp mla ashish shelar criticises state transport minister anil parab on msrtc bus for ganeshotsav)
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना आशिष शेलार म्हणाले की, कोकणातील चाकरमान्यांसाठी योग्य वेळेत निर्णय घ्या, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. यासंदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांचीही भेट घेतली. त्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विनंती केली होती. परंतु शासनाने कोणताच निर्णय घोषित केला नाही. तसंच ग्रामपंचायतींनी १४ दिवस क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतल्याने गेल्या ३ दिवसांपासून चाकरमानी कोकणात जाण्यासाठी धडपड करत आहेत.
एक तर ई-पास मिळत नव्हेत, ज्यांना पास मिळाले, त्यांच्या रांगा कशेडी घाड आणि खारेपाटणमध्ये लागल्या होत्या. अन्नपाण्याशिवाय चाकरमान्यांचे हाल सुरू आहेत. प्रवासाला अवघे २ दिवस शिल्लक असताना आता सरकारने निर्णय घोषित केला आहे.
हेही वाचा - कोकणात जाणाऱ्या एसटीला अखेर मुहूर्त, आरक्षण सुरू
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अर्धवट नाही पुर्ण निर्णय घ्या !आज परिवहन मंत्र्यांची घोषणा म्हणजे चाकरमान्यांची फसवणूक! pic.twitter.com/GFo7hjrPC9
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 4, 2020
गुरूवार मध्यरात्रीपासून एसटीचं बुकींग होणार असेल तर प्रवास कधी करणार? शासनाने १० दिवस क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला तरी ग्रामपंचायतींनी १४ दिवस क्वारंटाईनचा निर्णय घेतलेला आहे. त्यासंदर्भात शासनाच्या प्रतिनिधींनी स्थानिकांशी चर्चा केली आहे का? रेल्वे गाड्या सोडण्याची तयारी होती, तरी गाड्या का मागण्यात आल्या नाहीत? एसटीने जाणार त्यांना ई-पास नाही, मग खासगी गाडीने जाणाऱ्यांना का? शासनाने १० दिवस क्वारंटाईन करण्याचा घेतलेला निर्णय ग्रामपंचायतींनी मान्य न केल्यास काय करणार? आता एकाचवेळी एसटी आणि खासगी गाड्या रस्त्यावर आल्यास वाहतूक नियोजनाचं काय होणार?
केवळ २५० रुपयांत अँटीबाॅडी टेस्ट होत असताना चाकरमान्यांसाठी या टेस्ट शासनाने मोफत का केल्या नाहीत? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कोकणातील चाकरमान्यांची कोंडीच राज्य सरकारला करायची होती. म्हणून आता वरातीमागून घोडं असल्यासारखा निर्णय घेतला आहे, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी या निर्णयावर टीका केली आहे.
दरम्यान राज्य सरकारने एका बाजूला एसटी बस सोडण्याची घोषणा करतानाच क्वारंटाईनचा कालावधी कमी करत १४ दिवसांवरून १० दिवस केला आहे. त्याचप्रमाणे एसटीने जाणाऱ्यांसाठी ई-पासची अटही रद्द केली आहे. या निर्णयामुळे चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे. ४ आॅगस्टच्या मध्यरात्रीपासून प्रवाशांना एसटीचं तिकीट आरक्षित करता येणार आहे. तर ५ आॅगस्टपासून बस सोडण्यात येणार आहेत.
हेही वाचा - चाकरमान्यांनो, गणेशोत्सवाला कोकणात जाऊ नका, जयराज साळगावकरांचं आवाहन