Advertisement

‘त्या’ पक्षाने खबरदार राहावं, अदर पुनावाला प्रकरणावरून शेलारांचा इशारा

या मागे ज्यांचा हात आहे, त्यांनी खबरदार रहावं, अशा शब्दांत या धमकी प्रकरणावरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी इशारा दिला आहे.

‘त्या’ पक्षाने खबरदार राहावं, अदर पुनावाला प्रकरणावरून शेलारांचा इशारा
SHARES

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांना धमकावणाऱ्या पक्षाची आमच्याकडे माहिती आहे. या मागे ज्यांचा हात आहे, त्यांनी खबरदार रहावं, अशा शब्दांत या धमकी प्रकरणावरून भाजपचे आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी इशारा दिला आहे.

या प्रकरणात एका वृत्तवाहिनीने शिवसेनेचा उल्लेख केल्याने सर्वांच्या नजरा शिवसेनेकडे वळल्या आहेत. परंतु त्यावर वृत्तवाहिनीकडून खुलासाही करण्यात आलेला आहे.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना आशिष शेलार यांनी यावर भाष्य केलं. ते म्हणाले, सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात लस उत्पादन करून अनेकांचे प्राण वाचवणारे सीरम इन्स्टिट्यू टच्या अदर पुनावाला यांना चक्क संरक्षण मागावंस वाटणं, म्हणजे हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. त्यांच्या बोलण्याचा रोख जर स्थानिक, प्रादेशिक पक्षाकडे जात असेल, तर त्याचा तपास व्हायला हवा. केंद्र सरकारने त्यांना योग्य वेळेत सुरक्षा पुरवत आपलं काम चोख केलं आहे.

कोरोनाच्या संकटात आम्हाला राजकारण करायचं नाही. पण जशी परिस्थिती निवळेल, तसं या प्रकरणात ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील त्या पक्षाला उघडं करण्याचं काम भाजप नक्कीच करेल. माझ्याकडे आणि पक्षाकडे याची माहिती आहे. मात्र त्यावर आज भाष्य करणार नाही. यामागे ज्यांचा हात आहे त्यांनी खबरदार राहावं, आमच्याकडे माहिती येत आहे, असा इशारा यावेळी आशिष शेलार यांनी दिला.

हेही वाचा- अदर पुनावालांना सुरक्षा देण्यामागचं राजकारण काय?, काँग्रेसचा मोदी सरकारला सवाल

दरम्यान, कोविशील्ड ही कोरोना प्रतिबंधक लस पुरवण्यासाठी आपल्याला देशातील वेगवेगळे मुख्यमंत्री, बडे नेते आणि उद्योजकांकडून धमकावण्यात येत असल्याचा दावा अदर पुनावाला यांनी इंग्लडमधील यू.के 'दि टाईम्स' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. 

सीरमकडून भारतीयांच्या प्रचंड अपेक्षा आहेत. प्रत्येकाला लस तातडीने हवी आहे. आपल्याआधी इतरांना का लस दिली जातेय, हे त्यांना समजत नसल्याने अडचण निर्माण होतेय. सगळी जबाबदारी आपल्याच खांद्यावर असल्याचं दाखवलं जात आहे. पण आपण एकटे काही करू शकत नाही, अशी व्यथा त्यांनी मांडली.

सध्या भारत ज्या कोरोना संकटामध्ये सापडला आहे, त्यासाठी कोणाला दोषी ठरवता येईल अशा अर्थाचा प्रश्न पुनावाला यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, मी जर तुम्हाला योग्य उत्तर दिलं किंवा उत्तर जरी दिलं तर माझा शिरच्छेद केला जाईल. मी निवडणूक किंवा कुंभ मेळ्यासंदर्भात भाष्य करु शकत नाही. हा खूप संवेदनशील विषय आहे. मला वाटत नाही की परमेश्वरालाही परिस्थिती एवढी वाईट होईल याचा अंदाज बांधता आला नसता, असं भाष्य पुनावाला यांनी केलं.

भारतातील विमानांना प्रवेश बंदी होण्याआधीच पुनावाला यांनी इग्लंड गाठलं होतं. सध्या ते आपल्या पूर्ण कुटुंबासहीत तिथं वास्तव्यास आहेत. तसंच काही दिवसांनी भारतात परतू असंही ते म्हणाले आहेत.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा