Advertisement

अदर पुनावालांना सुरक्षा देण्यामागचं राजकारण काय?, काँग्रेसचा मोदी सरकारला सवाल

पुनावाला यांनी मागणी केलेली नसताना देखील त्यांना ही सुरक्षा पुरवण्यामागे कोणतं राजकारण आहे, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारला उद्देशून केला आहे.

अदर पुनावालांना सुरक्षा देण्यामागचं राजकारण काय?, काँग्रेसचा मोदी सरकारला सवाल
SHARES

केंद्र सरकारकडून पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. पुनावाला यांनी मागणी केलेली नसताना देखील त्यांना ही सुरक्षा पुरवण्यामागे कोणतं राजकारण आहे, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारला उद्देशून केला आहे.

काही दिवसांपूर्वीच वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. पुनावाला यांच्या जीवाला असलेल्या धोका पाहता केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भात आदेश जारी केला. आदेशानुसार सीआरपीएफची सुरक्षा त्यांना दिली जाणार आहे.

परंतु अदर पुनावाला हे सध्या भारतात नसताना तसंच त्यांनी राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यापैकी कुणाकडेही संरक्षणाची मागणी केलेली नसताना त्यांना ही सुरक्षा कशी काय देण्यात आली, असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला. ज्याला संरक्षण हवं आहे ती व्यक्ती आधी त्यासाठी अर्ज करते, त्यानंतर त्यांच्या जीविताला खरंच धोका आहे का किंवा अन्य बाबी तपासूनच निर्णय घेतला जातो. पण केंद्र सरकारने एकाएकी त्यांना ही सुरक्षा का द्यावी? त्यामागचा खेळ काय आहे? या सगळ्या गोष्टीचा खुलासा केंद्राने करावा आणि अदर पुनावाला यांनीही त्यांना कुणाकडून धमक्या आल्या हेही सांगावं, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

हेही वाचा- मुंबईतील दुसरी कोरोना लाट ‘या’ महिन्यात ओसरणार, शास्त्रज्ञांची दिलासादायक माहिती

दरम्यान, कोविशील्ड ही कोरोना प्रतिबंधक लस पुरवण्यासाठी आपल्याला देशातील वेगवेगळे मुख्यमंत्री, बडे नेते आणि उद्योजकांकडून धमकावण्यात येत असल्याचा दावा अदर पुनावाला यांनी इंग्लडमधील यू.के 'दि टाईम्स' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. 

सीरमकडून भारतीयांच्या प्रचंड अपेक्षा आहेत. प्रत्येकाला लस तातडीने हवी आहे. आपल्याआधी इतरांना का लस दिली जातेय, हे त्यांना समजत नसल्याने अडचण निर्माण होतेय. सगळी जबाबदारी आपल्याच खांद्यावर असल्याचं दाखवलं जात आहे. पण आपण एकटे काही करू शकत नाही, अशी व्यथा त्यांनी मांडली.

सध्या भारत ज्या कोरोना संकटामध्ये सापडला आहे, त्यासाठी कोणाला दोषी ठरवता येईल अशा अर्थाचा प्रश्न पुनावाला यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, मी जर तुम्हाला योग्य उत्तर दिलं किंवा उत्तर जरी दिलं तर माझा शिरच्छेद केला जाईल. मी निवडणूक किंवा कुंभ मेळ्यासंदर्भात भाष्य करु शकत नाही. हा खूप संवेदनशील विषय आहे. मला वाटत नाही की परमेश्वरालाही परिस्थिती एवढी वाईट होईल याचा अंदाज बांधता आला नसता, असं भाष्य पुनावाला यांनी केलं.

भारतातील विमानांना प्रवेश बंदी होण्याआधीच पुनावाला यांनी इग्लंड गाठलं होतं. सध्या ते आपल्या पूर्ण कुटुंबासहीत तिथं वास्तव्यास आहेत. तसंच काही दिवसांनी भारतात परतू असंही ते म्हणाले आहेत.

(maharashtra congress president nana patole raised questions on adar poonawalla y security from bjp govt)

हेही वाचा- उन्हाळ्याच्या सुट्टीत शिक्षकांनी मुंबईबाहेर जाऊ नये, मुंबई महापालिकेच्या सूचना

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा