केंद्राचा अर्थसंकल्प सोमवारी जाहीर झाला. अर्थसंकल्प जाहीर होताच विरोधकांकडून त्यातील तरतूदींवर जोरदार टीका करण्यात आली. खासकरून महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पात विशेष काहीही तरतूद नसल्याने नाराज झालेल्या विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं. अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा. तसे हे दिल्लीतील बाजीराव आहेत, असा टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही लगावला. त्यावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी पलटवार केला आहे.
जनमताचा नाही ठिकाणा अन् मला मुख्यमंत्री म्हणा.. असं ट्विट करत अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे.
हेही वाचा- पेट्रोल-डिझेल हजार रुपयांवर न्यायचंय का? संजय राऊतांचा टोला
"जनमताचा नाही ठिकाणा अन् मला मुख्यमंत्री म्हणा."https://t.co/zYEzmxR8rYhttps://t.co/PkSToT87Tq
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 2, 2021
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प (२०२१-२२) सादर केल्यानंतर त्यावर प्रसारमाध्यमांनी संजय राऊत यांची प्रतिक्रिया घेतली होती. यावर बोलताना, सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राची निराशा झाली आहे. मी या अर्थसंकल्पात महाराष्ट्र शोधण्याचा प्रयत्न करतोय. पण, बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काहीही विशेष तरतूद नाही. संपूर्ण बजेटचा भार महाराष्ट्रावर अवलंबून आहे. महाराष्ट्रानं देशाला देण्याची दानत दाखवली आहे. महाराष्ट्रावर मात्र नेहमीच अन्याय होत आलेला आहेत. अर्थमंत्री देत असलेले आकडे किती खरे आणि किती खोटे? हे सहा महिन्यात कळेल. त्यामुळे आता आर्थिक थापा बंद करायला हव्यात. खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा. तसे हे दिल्लीतील बाजीराव आहेत, असा टोला लगावला.
सादर झालेलं बजेट हे देशाचं होतं की पक्षाचं निधीवाटप होतं? हेच कळत नसून पेट्रोल-डिझेलवर अधिभार लावून त्यांना पेट्रोल- डिझेल हजार रुपये करुन लोकांना कायमचं मारायचं असेल. आधी लॉकडाऊनमुळं लोकं घरात होते आता पेट्रोलमुळे लोकांना प्रवास करता येणार नाही. लोकांनी कायमचं घरीच बसावं हरी भजन करत, असं बहुतेक सरकारला वाटत असेल, असंही संजय राऊत म्हणाले होते.
(bjp mla atul bhatkhalkar critised sanjay raut and cm uddhav thackeray over union budget 2021 reaction)