Advertisement

शरद पवार काय राज्याचे गृहमंत्री आहेत? ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याच्या हाकालपट्टीची मागणी

मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कथित भेटीवरून भाजपने संताप व्यक्त केला आहे.

शरद पवार काय राज्याचे गृहमंत्री आहेत? ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याच्या हाकालपट्टीची मागणी
SHARES

मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कथित भेटीवरून भाजपने संताप व्यक्त केला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने त्यांची भेट घ्यायला, शरद पवार (sharad pawar) काय राज्याचे गृहमंत्री आहेत? असा प्रश्न उपस्थित करत नांगरे-पाटील यांच्या हाकालपट्टीची मागणी देखील करण्यात आली आहे.

एका बाजूला राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाला असून दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे दुसरे मोठे नेते आणि अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक (nawab malik) यांच्या जावयाला ड्रग्जप्रकरणी राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. या दोन्ही प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते अडचणीत आलेले असताना विरोधी पक्ष भाजपकडून राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ले चढवण्यात येत आहेत.

त्यातच मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी गुरूवारी शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक इथं जाऊन त्यांची कथित भेट घेतल्याची चर्चा माध्यमांमध्ये पसरली. या दोन्ही प्रकरणावर चर्चा करण्यासाठीच शरद पवारांनी नांगरे-पाटील यांना बोलावून घेतल्याचं म्हटलं जाऊ लागलं. 

हेही वाचा- शरद पवारांनी घेतला यू टर्न, मुंडेंचं मंत्रीपद वाचलं!

या भेटीवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी तीव्र नापसंती दर्शवत थेट नांगरे-पाटील यांच्या हाकालपट्टीची मागणी केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी शरद पवारांसोबत चर्चा करायला ते राज्याचे गृहमंत्री आहेत की मुख्यमंत्री? राज्यात कोणतेही अधिकार पद नसलेल्या पवारांशी चर्चा करणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी मी कॅबिनेट सचिवांकडे करणार आहे. 

पाठीमागून सूत्र हलवण्यापेक्षा घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी, असं म्हणत अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर देखील निशाणा साधला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनासुद्धा धमकीचा फोन आला होता. त्यानंतर किशोरी पेडणेकरांनी थेट विश्वास नांगरे-पाटील यांना कॉल केला होता. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखील पोलिसांनी संबंधित आरोपीला २४ तासांच्या आत अटक केली होती. मुंबई पोलीस आता ही दोन्ही प्रकरणं कशी सोडवतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

(bjp mla atul bhatkhalkar slams on sharad pawar and mumbai police joint commissioner vishwas nangre patil meeting)

हेही वाचा- “संभाजीनगर म्हणा, नाहीतर धाराशीव..”, नामांतर वादावर शरद पवार पहिल्यांदाच बोलले


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा