भाजपाच्या बॅनर्समुळे मुंबई विद्रुप, शेलार पुन्हा मागणार का माफी?

  Mumbai
  भाजपाच्या बॅनर्समुळे मुंबई विद्रुप, शेलार पुन्हा मागणार का माफी?
  मुंबई  -  

  राजकीय बॅनर आणि फलक लावण्यास न्यायालयाने बंदी घालूनही मुंबईत पुन्हा एकदा राजकीय जाहिरातबाजींनी मुंबईला विद्रुप करण्याचे काम केले जात आहे. न्यायालयाच्या आदेशाचा धाकच आता राजकीय पक्षांना राहिलेला नसून, शुक्रवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या स्वागतासाठी मुंबई भाजपाच्या वतीने, तसेच युवा मोर्चाच्या वतीने मोठ्या प्रमाणात पश्चिम द्रुतगती महामार्गासह वीर सावरकर मार्ग शिवाजी पार्क, वरळी ते सह्याद्री अतिथीगृहापर्यंतच्या सर्व रस्त्यांवर बॅनर आणि फलक लावून मुंबई भाजपामय करुन टाकली होती. हे सर्व बॅनर संध्याकाळी महापालिकेच्या कामगारांनी उतरवले. परंतु यापूर्वी अशाच प्रकारे राजकीय बॅनर लावल्याप्रकरणी भाजपाचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांना दंड भरुन माफी मागावी लागल्यानंतरतही त्यांच्याच पक्षाने पुन्हा एकदा न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केले आहे.

  भाजपा सरकारला 3 वर्षे पूर्ण झाल्यामुळे या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे सध्या तीन दिवसांच्या मुंबई भेटीवर आले आहे. शुक्रवारी त्यांचे मुंबईत आगमन झाले. महापालिका निवडणुकीनंतर प्रथमच मुंबईत येणाऱ्या अमित शाह यांच्या स्वागताची जय्यत तयारी भाजपाने केली होती. यासाठी विमानतळावर शक्तिप्रदर्शनासह संपूर्ण मुंबईत शाह यांच्या स्वागताचे बॅनर आणि फलक लावण्यात आले होते. या राजकीय बॅनर, फलकांसह भाजपाचे झेंडेही लावत अवघी मुंबापुरी भाजपामय करुन टाकली होती. परंतु मुंबईत राजकीय बॅनर आणि फलक लावण्यास सक्त बंदी असून, न्यायालयाच्या आदेशानुसार याची अंमलबजावणी महापालिकेच्या वतीने केली जात आहे. परंतु न्यायालयाच्या आदेशालाही केराची टोपली दाखवत भाजपाचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार, भाजपाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष मोहित कंबोज यांच्यासह भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या विलेपार्लेपासून ते माहिमपर्यंत आणि शिवाजी पार्क, दादर, वरळीपासून ते मलबार हिलपर्यंत त्यांच्या स्वागताचे बॅनर आणि फलक लावले होते. दरम्यान, संध्याकाळी हे सर्व फलक आणि बॅनर त्वरीत काढण्याची कार्यवाही महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आली.


  हेही वाचा - 

  अमित शाहांचे स्वागत अन् भाजपाचे शक्तीप्रदर्शन


  भाजपाचे फलक काढले जात असल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी छेडले असता त्यांनी या कारवाईबाबत महापालिका आयुक्त अजोय मेहताच सांगू शकतील, असे सांगत अधिक बोलण्याचे टाळले. परवाना विभागाचे उपायुक्त प्रकाश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राजकीय बॅनरवर कारवाई करण्याचे अधिकार विभागाच्या कार्यालयातील वरिष्ठ परवाना निरीक्षकांना दिलेले आहेत. त्याप्रमाणे त्यांनी ही कारवाई केलेली असून, न्यायालयाच्या आदेशाच्या उल्लंघनाप्रकरणी जी काही कायद्यात तरतूद आहे, त्याप्रमाणे पुढील कार्यवाहीही ते करतील, असे सांगितले.

  यापूर्वी राजकीय बॅनर लावल्याप्रकरणी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना एक लाख रुपयांचा दंड झाला होता. या दंड वसुलीनंतर त्यांनी यापुढे आपल्या पक्षाच्या वतीने राजकीय बॅनर लावले जाणार नाहीत, असे हमीपत्र दिले होते. परंतु पुन्हा भाजपाच्या वतीने अशाप्रकारे राजकीय बॅनर लावले गेल्यामुळे शेलार यांना पुन्हा एकदा न्यायालयाच्या चौकटीत उभे राहावे लागेल का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.