Advertisement

मराठा मोर्चात भाजप कार्यकर्ता म्हणून सहभागी होणार- चंद्रकांत पाटील

मराठा समाजाद्वारे होणाऱ्या प्रत्येक आंदोलनात झेंडे, घोषणा, बॅच अशा कुठल्याही पक्षीय ओळखीशिवाय भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता नागरिक म्हणून सहभागी होईल.

मराठा मोर्चात भाजप कार्यकर्ता म्हणून सहभागी होणार- चंद्रकांत पाटील
SHARES

आम्हाला मराठा समाजाचं हित बघायचं आहे. त्यामुळे मराठा समाजाद्वारे होणाऱ्या प्रत्येक आंदोलनात झेंडे, घोषणा, बॅच अशा कुठल्याही पक्षीय ओळखीशिवाय भारतीय जनता पार्टीचा (bjp) प्रत्येक कार्यकर्ता नागरिक म्हणून सहभागी होईल, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. 

शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांनी बीड इथं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चाचं आयोजन केलं आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की, विनायक मेटेंने बीड इथं ५ जून रोजी मराठा समाजाच्या मोर्चाची घोषणा केली आहे. भारतीय जनता पार्टीने आधीच घोषित केलं आहे की कुठलेही झेंडे वा बॅनर न वापरता आम्ही या मोर्चात सहभागी होणार आहोत. राजकीय हितापेक्षा आम्हाला मराठा समाजाचं हित बघायचं आहे. मराठा आरक्षणासाठी जे जे काही सकारात्मक आणि रचनात्मक करण्यात येईल, तिथं आम्ही पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहोत. भाजपचे सगळे नेते, पदाधिकारी, नगरसेवक, आमदार-खासदार या मोर्चात सहभागी होतील. हे सगळेजण छातीला बॅच देखील लावणार नाहीत, असंही चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी स्पष्ट केलं.

हेही वााचा- तर हा संभाजी महाराज आडवा येईल.., मराठा आरक्षणावर आक्रमक

ते पुढं म्हणाले, फडणवीस सरकारने जेव्हा मराठा आरक्षणं दिलं, तेव्हा ब्राम्हण समाजाची विशेषत: आरक्षण नसणाऱ्या ब्राम्हण, मारवाडी, गुजराती समाजातील काही घटकांची अशी मागणी होती की, या समाजातील गरजवंतांसाठी एक महामंडळ स्थापन व्हावं. त्यानंतर आरक्षण मिळत नाही असे सगळे, मुख्यत्वे व्यापारी समाजाला डोळ्यापुढे ठेवून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी 'अमृत' महामंडळाची योजना आखली होती.

या योजनेची सगळी फाईल तयार आहे. कॅबिनेटमध्ये मंजूर झाली की जीआर निघणार. तेवढ्यात आचारसंहीता लागली. मग गेल्या दीड वर्षांत कोविडमुळे असेल किंवा सामाजिक दूरदृष्टी नसल्यामुळे असेल असे सगळेच विषय प्रलंबित आहेत. सारथीची वाट लागली आहे. अण्णासाहेब महामंडळाचा बोऱ्या वाजलेला आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात अस्तित्वात असलेल्या सगळ्या महामंडळाची दयनीय अवस्था झाली आहे. हे तर अस्तित्वात यायचं होतं, त्यामुळे हे पडून आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

देवेंद्रजी फडणवीसांच्या कार्यकाळात मराठा समाजासाठी सारथी महामंडळाची स्थापना झाली. महाविकास आघाडी सरकारने पहिलं केलेलं काम म्हणजे सारथीची स्वायत्तता रद्द केली. मराठा समाजाचं आत्ताचं मत असं आहे की आरक्षण मिळेपर्यंत देवेंद्रजींनी दिलेल्या सगळ्या सवलती आम्हाला परत द्या, असंही पाटील यांनी सांगितलं.

(bjp will participate in every maratha rally says chandrakant patil)

हेही वााचा- मराठा आरक्षण: नोकरभरतीचा निर्णय अहवालानंतरच


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा