Advertisement

भाजपा विरोधी पक्षात बसणार?


भाजपा विरोधी पक्षात बसणार?
SHARES

मुंबई - मुंबई महापालिकेत पाचही अपक्षांसह शिवसेनेने आपले संख्याबळ वाढवून मोठा पक्ष असल्याचे जवळपास सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. परंतु दुसरीकडे समाजवादी पक्ष, एआयएमआयएम तसेच काँग्रेसनेही भाजपाला पाठिंबा न देण्याचे जाहीर केले. त्यामुळे अजूनही भाजपाची मदार ही मनसेवर अवलंबून असून मनसेने पाठिंबा दिला तरच भाजपा आणि शिवसेनेला बरोबरीत रोखणे शक्य आहे. परंतु मनसेने भाजपाला साथ न दिल्यास शिवसेनाच मोठा पक्ष होणार असल्याने भाजपाने विरोधी पक्षात बसण्याची मानसिक तयारी केली असल्याचे समजते.

मुंबई महापालिकेत शिवसेनेचे 84 आणि पाच अपक्ष निवडून आलेत. या पाचही अपक्षांपैकी चार अपक्षांनी शिवसेनेला अधिकृत आणि मुमताज खान यांनी छुपा पाठिंबा दिल्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ 89 एवढे झाले आहे. महापालिकेत काँग्रेसचे 31 नगरसेवक निवडून आले. काँग्रेसचा पाठिंबा गृहीत धरल्यास शिवसेनेची संख्या 120 वर जाऊ शकते. परंतु काँग्रेसने शिवसेनेसह भाजपालाही पाठिंबा देण्यास नकार दिल्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ 89 एवढेच आहे. दुसरीकडे सपा आणि एआयएमआयएमनेही दोन्ही पक्षांना पाठिंबा देण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे आता मनसे हा एकमेव पक्ष उरला आहे. मनसेचे सात नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे मनसे कुणाला पाठिंबा देते याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

मनसेने भाजपाला पाठिंबा दिल्यास भाजपाची संख्या ही 82 अधिक 7 याप्रमाणे 89 एवढी होणार आहे. त्यामुळे दोघांचीही संख्या सम-समान होणार आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपात महापौरपदाची निवड अटीतटीची होणार आहे. परंतु मनसेने भाजपाला साथ न देता तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यास शिवसेनेला आपला महापौर बसवण्याची मार्ग सुकर होईल. त्यामुळे मनसे कुणाला पाठिंबा देते हे निर्णायक ठरणार आहे. संख्याबळ न झाल्यास विरोधीपक्षात बसावे, पण शिवसेनेसोबत जाऊ नये अशी भूमिका मुख्यमंत्र्यांसह भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत सत्तेसाठी प्रयत्न करावा आणि त्यानंतरच संख्याबळ होत नसल्यास विरोधी पक्षात बसण्यावर सर्वांचेच एकमत झाल्याचे भाजपाच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

महापौरपदासह नेतेपदासाठी दोन्ही पक्षात चुरस

सत्तेसाठी शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना आणि भाजपाचा लढा सुरू असला तरी महापौरपदासह नेतेपदासाठी दोन्ही पक्षातील नगरसेवकांमध्ये चुरस सुरू आहे. महापालिकेत शिवसेनेचे मंगेश सातमकर, यशवंत जाधव, आशिष चेंबूरकर हे अनुभवी असून महिलांमध्ये राजुल पटेल, किशोरी पेडणेकर, शुभदा गुडेकर आणि विशाखा राऊत अनुभवी आहेत. भाजपामध्येही महापौरपदासाठी मनोज कोटक आणि राम बारोट यांची नावे आहेत. परंतु हे अमराठी चेहरे असल्यामुळे पाचवेळा निवडून आलेल्या शैलजा गिरकर यांचेही नाव आघाडीवर आहे.

सभागृहनेतेपदासाठी शिवसेनेकडून विशाखा राऊत, राजुल पटेल तसेच सर्वात अनुभवी आणि माजी महापौर श्रद्धा जाधव यांचेही नाव चर्चेत आहे. तर पुरुषांमधून मंगेश सातमकर यांचे नाव घेतले जात आहे. भाजपाकडून गटनेतेपदासाठी अतुल शहा यांच्यासह मराठी चेहरा म्हणून शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी प्रभाकर शिंदे यांच्या नावाचा विचार केला जात आहे. स्थायी समिती अध्यक्षपदी आजवर महिला नगरसेवकाची निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे रमेश कोरगावकर यांचेच नाव आघाडीवर असून मागील वेळेस त्यांचाच क्रमांक असताना यशोधर फणसे यांना अध्यक्ष बनवण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा कोरगावकर यांचे नाव स्पर्धेत आहे. त्यामुळे कुणाची सत्ता येते आणि कोण महापौरपदपदी बसते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा