Advertisement

मुंबईचा पुढचा महापौर भाजपचा, चंद्रकांत पाटील यांचा दावा

आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर मुंबईत भाजपचा महापौर असेल, असा दावा रविवारी या पक्षाकडून करण्यात आला.

मुंबईचा पुढचा महापौर भाजपचा, चंद्रकांत पाटील यांचा दावा
SHARES

मुंबईच्या नव्या महापौर म्हणून शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका किशोरी पेडणेकर पयांची शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात आली. तर अॅड सुहास वाडकर यांची उपमहापौर म्हणून करण्यात आली. यावेळी भाजपनं आपला उमेदवार दिला नव्हता. मात्र, 'आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर मुंबईत भाजपचा महापौर असेल', असा दावा रविवारी या पक्षाकडून करण्यात आला. त्यामुळं पुढील महापालिका निवडणुकीत शिवसेनेला भाजपकडून आव्हान मिळण्याची शक्यता आहे.

मुंबईवर लक्ष

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना हा दावा केला. मुंबईतील भाजपची संघटनात्मक बैठक संपल्यानंतर बोलताना स्पष्ट केलं. 'राज्यातील पक्षसंघटना आणखी मजबूत करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या आम्ही मुंबईवर लक्ष केंद्रीत केले आहे. सन २०२२ची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकणं हे भाजपचं एकमात्र उद्दिष्ट आहे. त्यामुळं मुंबईच्या बाबतीत लहानसहान गोष्टींचा विचार आम्ही करीत आहोत. येत्या १५ डिसेंबरपर्यंत वॉर्ड अध्यक्ष, २० डिसेंबरपर्यंत विधानसभा क्षेत्र, २५ डिसेंबरपर्यंत जिल्हाध्यक्ष आणि ३० डिसेंबरपर्यंत मुंबई भाजपच्या अध्यक्षांची निवड होईल', असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

खडसे भाजप सोडणार नाहीत

'मुंबईचा नवा अध्यक्ष घोषित करताना केंद्रातील एखादा नेता उपस्थित असणार आहे', असंही त्यांनी स्पष्ट केलं. या बैठकीला विनोद तावडे, आशीष शेलार आणि राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश आदी उपस्थित होते. त्याशिवाय, 'खान्देशातील भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजप सोडणार नाहीत', असा विश्वासही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

खडसेंचा मोठा वाटा

'महाराष्ट्रात भाजपचे जे संघटन आज उभे राहिले आहे, त्यात एकनाथ खडसे यांचा मोठा वाटा आहे. गेल्या ३० वर्षांत कोणत्याही एका पक्षाला विधानसभा निवडणुकीत शंभरहून अधिक जागा जिंकणं शक्य झालं नव्हतं. ते भाजपनं करून दाखवलं आहे. यात भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासह एकनाथ खडसे यांचाही मोठा वाटा आहे', असे पाटील यांनी म्हटलं. 'खडसेंनी विरोधी पक्षात असताना अत्यंत प्रभावीपणे काम केलं आहे. ते भाजपचे नेते आहेत. त्यामुळं भाजप सोडण्याचा विचार ते आणि आम्हीही मनात आणणार नाही', असंही चंद्रकांत पाटील यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं.



हेही वाचा -

२८ दिवसांच्या उपचारांनंतर लतादीदी घरी परतल्या

'इथं' मिळतं १० रुपयात जेवण



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा