Advertisement

आय.ए.एस. अकॅडेमीच्या नावाखाली आणखी एक जागा शिवसेनेच्या कब्जात


आय.ए.एस. अकॅडेमीच्या नावाखाली आणखी एक जागा शिवसेनेच्या कब्जात
SHARES

वांद्रे पश्चिम येथील महापालिकेला मिळालेली इमारत शिव विद्या प्रबोधिनी बाळासाहेब ठाकरे आय.ए.एस अकॅडेमीला काळजीवाहू तत्वावर वाटप करण्याचा प्रस्ताव सुधार समितीत मंजूर झाल्यानंतर शनिवारी हाच प्रस्ताव भाजपाला गाफील ठेवत मंजूर करण्यात आला. हा भूखंड देण्यास भाजपाचा विरोध होता. परंतु कोस्टल रोडच्या नावाखाली भाजपाला गुंडाळत शिवसेनेने हा प्रस्ताव मंजूर केला. हा प्रस्ताव मंजूर केला जात असताना भाजपाचा एकही सदस्य सभागृहात उपस्थित नव्हता. त्यामुळे या प्रस्तावाबाबतचा भाजपाचा विरोध मावळला का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.


२७ मार्चला मंजूर केला प्रस्ताव

वांद्रे पाली हिल येथील पाली हिल रोड क्रमांक १मधील युनियन पार्कमध्ये समायोजित आरक्षणांतर्गत प्राप्त झालेल्या समाजकल्याण केंद्राची जमीन यापूर्वी भजनदास बजाज फाऊंडेशनला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार या संस्थेला ही जागा देण्याचा प्रस्ताव डिसेंबर २०१७ रोजी सुधार समितीच्या पटलावर ठेवण्यात आला असता तो नामंजूर करण्यात आला. महापालिका सभागृहात हा प्रस्ताव नामंजूर केल्यानंतर ही जागा शिवसेनेच्या शिव विद्या प्रबोधिनी बाळासाहेब ठाकरे आय.ए.एस अकॅडेमीसाठी मिळावी म्हणून १६ मार्च २०१८रोजी संस्थेचे संस्थापक संचालक विजय कदम यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले. त्यानुसार २७ मार्चला याचा प्रस्ताव तातडीने सुधार समितीच्या पटलावर आणून तो मंजूर करण्यात आला होता.

भाजपाला ठेवलं जाणीवपूर्वक दूर?

हा प्रस्ताव तातडीचे कामकाज म्हणून एप्रिल महिन्याच्या पहिल्या सभेत घेतला जाणार होता. परंतु भाजपाकडून याला जोरदार विरोध होईल म्हणून तो प्रस्ताव त्यावेळी पुकारला गेला नाही. मात्र, शनिवारी झालेल्या महापालिकेच्या सभेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

सेनेने भरली ९२ हजारांची अनामत रक्कम

तळ अधिक एक मजला असलेल्या या बांधीव इमारतीचे एकूण क्षेत्रफळ ४६२.५२ चौरस मीटर एवढे असून प्रती वर्षी ४६ हजार २५२ इतके शुल्क आकारले जाणार आहे. तसेच ९२ हजार ५०४ इतकी अनामत रक्कम भरून ही इमारत सेनेने आपल्या कब्जात घेतली आहे.

भाजपाच्या अनुपस्थितीचं गुपित काय?

वांद्र्यातील हा भूखंड सेनेच्या संस्थेकडून लाटला जात असल्याने खुद्द भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह अनेकांचा याला अप्रत्यक्ष विरोध होता. परंतु प्रत्यक्षात हा प्रस्ताव संमत होत असताना मात्र भाजपाचा एकही सदस्य उपस्थित न राहणे यामागचे गुपित काय? असा प्रश्न आता सर्वांनाच पडू लागला आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या एका भेटीत भाजपाला शह देणाऱ्या दोन प्रस्तावांवरील निर्णयात महत्वाची भूमिका बजावल्याचे या मंजूर प्रस्तावावरून दिसून येत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा