Advertisement

मुंबई महापालिकेत हाणामारी; नगरसेवक-कंत्राटदारामध्ये राडा

महापालिकेच्या लेखा विभाग कार्यालयात कंत्राटदार आणि नगरसेवक यांच्यात मारामारी झाली असल्याचे समजते. कंत्राटदाराने, नगरसेवकाबाबत आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केल्यामुळे त्यांनी या कंत्राटदाराला चोप दिला आहे.

मुंबई महापालिकेत हाणामारी; नगरसेवक-कंत्राटदारामध्ये राडा
SHARES

मुंबई महापालिकेतील एका नामांकित कंत्राटदाराला शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेवकाने चोप दिल्याची घटना मंगळवारी रात्री महापालिकेत घडली आहे. महापालिकेच्या लेखा विभाग कार्यालयात कंत्राटदार आणि नगरसेवक यांच्यात मारामारी झाली असल्याचे समजते. कंत्राटदाराने, नगरसेवकाबाबत आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केल्यामुळे त्यांनी या कंत्राटदाराला चोप दिला आहे.


आक्षेपार्ह टिप्पणीमुळे झाला राडा

खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महापालिका मुख्यालयातील चौथ्या मजल्यावर लेखा विभागात शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक दिलीप लांडे मंगळवारी एका अधिकाऱ्याला भेटायला गेले होते. तेव्हा त्या ठिकाणी महापालिकेतील सर्वात जुने आणि प्रसिद्ध असलेले एक कंत्राटदार आले. यावेळी त्यांनी शिपायाजवळ कॅबिनमध्ये कोण आहे? अशी विचारणा केली. शिपायाने दिलीप लांडे हे आतमध्ये असल्याचे सांगितले. यावर संबंधित कंत्राटदाराने लांडे यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केली. हे तिथे उभ्या असलेल्या लांडे यांच्या नातेवाईकाने ते ऐकले. याबाबतची माहिती त्यांनी लांडे यांना दिल्यानंतर त्यांनी याचा जाब त्या कंत्राटदाराला विचारला.


कंत्राटदारावर पालिकेत होती बंदी

मात्र, यावर कंत्राटदार निरुत्तर होताच त्यांनी त्याला चांगलाच चोप दिला. यामध्ये कंत्राटदाराचे कपडेही फाटल्याचे समजते. तब्बल २० ते २५ मिनिटे कंत्राटदार आणि नगरसेवक यांच्यात हाणामारी चालू होती. संबंधित कंत्राटदार हा एकेकाळचा महापालिकेतील अनभिषिक्त सम्राट समजला जायचा. परंतु, मागील स्थायी समिती अध्यक्ष शैलेश फणसे यांनी त्याला महापालिकेत येण्यास बंदी घातली होती. त्यामुळे हा कंत्राटदार महापालिकेत फिरकतही नव्हता. आता पुन्हा हा कंत्राटदार महापालिकेत जम बसवू पाहत होता. परंतु, या हाणामारी प्रकारामुळे या कंत्राटदाराच्या महापालिकेतील प्रवेशावर बंदी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


अधिकृत तक्रार नाही

दरम्यान, या कंत्राटदाराच्या मारहाणीबाबत कुणीही अधिकृत तक्रार केलेली नसल्याने महापालिकेच्या सुरक्षा विभागाकडूनही याची दखल घेतली गेलेली नाही.



हेही वाचा

प्लास्टिक बंदीचा दिव्याखाली अंधार!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा