...आणि महापालिका आयुक्त थोडक्यात बचावले!

 BMC
...आणि महापालिका आयुक्त थोडक्यात बचावले!

बीएमसी - महापालिका मुख्यालयातील आयुक्तांच्या लिफ्टमध्ये एक कर्मचारी तब्बल सव्वा दोन तास अडकून पडला होता. त्यानंतर अग्निशमन दल आणि ओटीस कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याची सुटका करण्यात आली. विशेष म्हणजे दहा मिनिटांपूर्वीच महापालिका आयुक्त अजॉय मेहता हे या लिफ्टने कार्यालयात आले होते. दरम्यान, या कर्मचाऱ्याला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

महापालिका प्रवेश क्रमांक 2 मधील लिफ्टचा वापर हा विशेष महापालिका आयुक्त, सुधार समिती अध्यक्ष, इतर समिती अध्यक्ष आणि आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून केला जातो. सकाळी 11.20 च्या सुमारास आयुक्त कार्यालयातील लिपिक गजानन चौधरी हे या लिफ्टमध्ये अडकले. त्यानंतर त्वरित मुंबई अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर ओटीस कंपनीचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. ओटीसच्या कर्मचाऱ्यांनी या लिपिक कर्मचाऱ्याची तब्बल सव्वा दोन तासांनी सुटका केली.

ओटीसच्या कर्मचाऱ्यांना लिफ्ट उघडण्यात बराच वेळ लागला. परंतु या दरम्यान त्याच्याशी संवाद साधला जात होता. त्याला बाहेर काढल्यानंतर त्याने कामाला सुरुवातही केली होती. परंतु मुख्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सूचनेनुसार त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात पाठवण्यात आले. त्याची प्रकृती ठीक असल्याचा निर्वाळा डॉक्टरांनी दिल्यानंतर त्याने पुन्हा कामाला सुरुवात केली. महापालिका मुख्यालयात आपत्कालीन नियंत्रण कक्ष असूनही कर्मचाऱ्याची सुटका करण्यास विलंब झाला. लिफ्टमध्ये चौधरी हा एकटाच होता. जर यामध्ये अधिक कर्मचारी असते तर गुदमरण्याचे प्रमाण वाढून मोठी दुर्घटना झाली असती, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती.

Loading Comments