Advertisement

वरवरा राव यांच्यावर होणार नानावटी रुग्णालयात उपचार

८२ वर्षांचे कवी-लेखक वरवरा राव यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.

वरवरा राव यांच्यावर होणार नानावटी रुग्णालयात उपचार
SHARES

भीमा-कोरेगाव प्रकरणी अटकेत असलेले ८२ वर्षांचे कवी-लेखक वरवरा राव यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. वरवरा राव सध्या तळोजा कारागृहात असून गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी त्यांच्या पत्नी हेमलता यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. या याचिकेवर सुनावणी करत असताना उच्च न्यायालयाने राव यांच्यावर पुढील १५ दिवस नानावटी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी दिली आहे.

वरवरा राव २०१८ पासून तळोजा कारागृहात आहेत. मागील काही महिन्यांपासून ते अंथरुणावर खिळून आहेत. तसंच त्यांना लिव्हरचा त्रासही होत आहे. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाही झाला होता. त्यामुळे वरवरा राव यांची प्रकृती गंभीर बनली आहे. त्यांच्यावर उपचार न झाल्यास त्यांचा जीव जावू शकतो. तसं झाल्यास ही कस्टोडीअल डेथची केस बनेल. म्हणूनच त्यांना पुन्हा नानावटी रुग्णालयात हलवण्याचे निर्देश द्यावेत आणि त्यांची जामिनावर मुक्तता करावी, असं वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी राव यांची बाजू मांडताना सांगितलं. तर राव यांची प्रकृती खालावलेली असली तरीही डॉक्टर त्यांची काळजी घेत असल्याचं मुख्य सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी एनआयएच्या वतीने सांगितलं.

हेही वाचा- ज्येष्ठ कवी वरवरा राव यांचा वैद्यकीय अहवाल सादर करा- बॉम्बे हायकोर्ट

दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने वरवरा राव यांच्यावर पुढील १५ दिवस नानावटी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी दिली आहे. मात्र उच्च न्यायालयाची परवानगी घेतल्याविना वरवरा राव यांना नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येऊ नये, असेही खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले आहे. वरवरा राव यांचे कुटुंबीय राव यांना रुग्णालयाचे नियम पाळून नानावटी रुग्णालयात त्यांना भेटू शकतील, राज्य सरकारने वरवरा राव यांची वैद्यकीय तपासणी व चाचण्यांचा अहवाल न्यायालयात सादर करावा, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. याविषयी पुढील सुनावणी ३ डिसेंबर रोजी घेण्यात येईल.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा