Advertisement

'न्यूज १८-लोकमत' विरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव


'न्यूज १८-लोकमत' विरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव
SHARES

'न्यूज १८-लोकमत' या मराठी वृत्तवाहिनीचे मालक, संपादक, वृत्तसंपादक, वृत्तनिवेदक, वार्ताहर आणि एचडीआयएल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद पुरंदरे यांच्याविरुद्ध विधान परिषदेत गुरूवारी विशेषाधिकार भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीची विशेषाधिकार समितीमार्फत चौकशी करुन एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश सभापतींनी रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले आहेत.

महाराष्ट्र विधानमंडळ आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासंदर्भात अवमानकारक व विशेषाधिकाराचा भंग करणारं वृत्त बेजबाबदारपणे प्रसारित केल्याबद्दल आ. हेमंत टकले यांनी महाराष्ट्र विधानपरिषद नियम २४१ अन्वये हा विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. या प्रस्तावात न्यूज १८-लोकमत" या मराठी वृत्तवाहिनीचे मालक, संपादक, वृत्तसंपादक, वृत्तनिवेदक, संबंधीत वार्ताहर आणि एचडीआयएल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद पुरंदरे यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत.


काय होतं त्या क्लिपमध्ये ?

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना २८ फेब्रुवारी, २०१८ रोजी 'न्यूज १८-लोकमत' मराठी वृत्तवाहिनीवर "महागौप्यस्फोट" या मथळ्याखाली एक वृत्त प्रसारित करण्यात आलं. हा चित्रवृत्तात एक कथित बांधकाम व्यावसायिक आणि कथित मध्यस्थ अशा दोन व्यक्तींमधील दूरध्वनी संभाषणाची मुद्रित ध्वनीचित्रफीत ऐकवण्यात आली. त्यात विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्यांना लक्षवेधी राखून ठेवण्यासाठी ५० लाख रुपये पोहोचल्याचा आरोप करण्यात आला. एवढंच नाही तर वाहिनीलाही सत्याची जाणीव असल्याने "आम्ही या वृत्ताची पुष्टी करत नसल्याचं बातमीत स्पष्ट केलं होतं, असं आमदार हेमंत टकले यांनी हक्कभंग प्रस्तावात नमूद केलं आहे.


कुठे आहे धनंजय मुंडे यांचा उल्लेख?

या कथित ध्वनीचित्रफीतीत एकाच ठिकाणी परिषदेतील विरोधी पक्ष नेत्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. तो पुढीलप्रमाणे आहे-
"मला (धनंजय गावडे) बोलतो, प्रमोद उद्या जर काही झालं ना, तर धनंजय मुंडेला पैसे द्यायला लागले ना तर माझ्या पदरचे मी देईन; पण हा विषय येऊ देणार नाही. तू टेन्शन नको घेऊ त्याला सांग."


अहवाल सादर करण्याचे निर्देश

वरील वाक्यातून कुठेही असं ध्वनीत होत नाही की, विरोधी पक्ष नेत्यांचा या प्रकरणात अर्थाअर्थी संबंध आहे, असं स्पष्टीकरण हेमंत टकले यांनी दिलं. यावर सभापतींनी विशेषाधिकार समितीमार्फत चौकशी करुन एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.



हेही वाचा-

पंकजा, धनंजय पुन्हा आमने-सामने!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा