Advertisement

अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात

अधिवेशनात मराठा, मुस्लिम तसंच धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा, शेतकर्‍यांना मिळणारा हमीभाव, दरवाढ, राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यांवरून विरोधक भाजप सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीतच असतील.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात
SHARES

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनास २५ फेब्रुवारी म्हणजेच सोमवारपासून सुरूवात झाली आहे. हे अधिवेशन एक आठवडा म्हणजेच २ मार्चला संपेल. अधिवेशनात मराठा, मुस्लिम तसंच धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा, शेतकऱ्यांना मिळणारा हमीभाव, दरवाढ, राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यांवरून विरोधक भाजप सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीतच असतील. पण विरोधकांचे मनसुबे उधळून लावण्याची तयारी सत्ताधारी शिवसेना आणि भाजप सरकारनं केली आहे.


अभिभाषणानं सुरुवात

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अभिभाषणानं या अधिवेशनाची सुरुवात होईल. दुसऱ्या दिवशी अभिभाषणावरील अभिनंदनाचा प्रस्ताव चर्चेला येईल. २७ फेब्रुवारीला म्हणजेच बुधवारी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. त्याच दिवशी विधान परिषदेत वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. मात्र विरोधी पक्षाने अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यास विरोध केला असून लेखानुदानाच्या मागणीसाठी रणकंदन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अधिवेशनात १७ पेक्षा अधिक विधेयकं आणि ४ अध्यादेश सभागृहात सादर होतील.


अंतिम आठवडा प्रस्तावाद्वारे चर्चा

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर अंतिम आठवडा प्रस्तावाद्वारे १ मार्चला चर्चा होईल आणि २ तारखेला म्हणजे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारकडून त्या चर्चेचं उत्तर दिलं जाईल. अधिवेशनानंतर लगेच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल. त्यामुळे अधिवेशनात पुरवणी मागण्यांवरील चर्चा आणि दुष्काळावरील चर्चेच्या निमित्तानं सरकारची कोंडी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असेल.


विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

रविवारी म्हणजे २४ फेब्रुवारीला अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षानं बहिष्कार टाकला होता. पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री चहापानाचा कार्यक्रम कसा काय ठेवू शकतात? असा सवाल करत विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला.


मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनीही रविवारी विविमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेतली. यावेळी विरोधकांच्या आरोपावर देवेद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. चहापान हे काही सेलिब्रेशन नाही तर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन चर्चा करण्याचं व्यासपीठ आहे.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा