Advertisement

नार्वेकरांचा बंगला अखेर जमीनदोस्त!

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी या अनधिकृत बंगल्याविरोधात स्थानिक प्रशासनाने सातत्याने तक्रारी केल्या होत्या.

नार्वेकरांचा बंगला अखेर जमीनदोस्त!
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांचा मुरुडच्या समुद्र किनाऱ्यावर अनधिकृतरित्या उभारण्यात आलेला बंगला अखेर जमीनदोस्त करण्यात आला आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी या अनधिकृत बंगल्याविरोधात स्थानिक प्रशासनाने सातत्याने तक्रारी केल्या होत्या. तर दुसरीकडे प्रशासनाने कारवाई करण्याआधी नार्वेकर यांच्याकडूनच ब्ंगल्याचं पाडकाम करण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात येणाऱ्या मुरूडच्या समुद्र किनारी मिलिंद नार्वेकर यांनी बंगल्याचं बांधकाम सुरू केलं होतं. परंतु समुद्रा लगतचा हा परिसर सीआरझेड ३ मध्ये येत असल्याने हे बांधकाम अवैध असल्याचा दावा करण्यात येत होता. शिवाय या बांधकामासाठी नार्वेकर यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नव्हती, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यामुळे सोमय्या यांनी या बंगल्याविरोधात स्थानिक ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, जिल्हाधिकारी, जिल्हा सागरी किनारा व्यवस्थापन समिती, महाराष्ट्र सागरी किनारा झोन व्यवस्थापन प्राधिकरण व पर्यावरण खात्याकडे तक्रार नोंदवली होती. 

हेही वाचा- यंदाही मानाच्या हंड्या फुटणार नाहीत; राज्य सरकारनं नाकारली परवानगी

तक्रार नोंदवूनही बंगल्यावर कारवाई होत नसल्याने मुख्यमंत्री कार्यालयाच्या दबावापुढं झुकून रत्नागिरी जिल्हा प्रशासन अनधिकृत बांधकामाला पाठिशी घालत असल्याचा आरोपही सोमय्या यांच्याकडून सोशल मीडियावर सुरू होता. या प्रकरणाची लोकायुक्त व राष्ट्रीय हरित लवादाकडं देखील सुनावणी सुरू होती. या प्रकरणाचा वाद वाढल्यानंतर अखेर हे बांधकाम तोडण्यात आलं आहे.

किरीट सोमय्या यांनी बंगल्याच्या तोडकामाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करताना, 'करून दाखविलं, पुढचा नंबर परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टचा. 'उद्या मी स्वत: दापोलीला जाऊन तोडकामाची पाहणी करणार आहे,' अशी माहितीही दिली. अनिल परब यांनी देखील मुरुडच्या समुद्र किनाऱ्यावर बेकायदा रिसॉर्ट बांधल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.  


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा