Advertisement

हंडीतलं दही कुणाला?


हंडीतलं दही कुणाला?
SHARES

दहीहंडीच्या थरांवरून सुरू झालेले राजकारण हंड्या फुटल्यानंतर थेट महापालिका निवडणुकांपर्यंत सुरू राहील याची काळजी नेतेमंडळी घेत आहेत. 20 फुटांपेक्षा उंच हंडीवर बंदी घालून सर्वोच्च न्यायालयाने हंडीतून मतांची हुंडी जमवणाऱ्यांना चाप लावलाय. पण, राज ठाकरेंनी थेट न्यायालयालाच आव्हान देऊन ठाकरी बाणा पुन्हा मैदानात चर्चेत आणण्याचा प्रयत्न केलाय. तसेच राज्य सरकारवर पळपुटेणाचा छाप मारत त्यांनी पुन्हा एकदा मराठीचे कार्ड चालवण्याची खेळी खेळली आहे. त्याचवेळी, त्यांचे चुलतबंधू आणि सत्तेतील वाटेकरी असणारे शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भाजपला अडचणीची ठरणारी नेहमीची भूमिका घेत वादाची हंडी फोडण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सामनातूनच केलाय. थोडक्यात, दोघांनीही मराठी, हिंदू सणांचा मुद्दा पुढे करत नियमांचे बंधन आमच्यावरच का, असा टाहो फोडलाय, जो बहुतांश तरुण मंडळींच्या मनाला भिडणारा आहे, हेही नाकारता येत नाही. मात्र, हिंदुत्वाचाच अजेंडा राबवणाऱ्या सत्ताधारी भाजपची यातून पुन्हा कोंडी झाली आहे. त्याचवेळी, लाखोंच्या दहीहंड्या बांधून मतांची बेगमी करणाऱ्या राम कदम, प्रताप सरनाईक, जितेंद्र आव्हाड, सचिन अहिरसारख्या नेत्यांची चुप्पी केवळ राजकीय सोयीसाठी आहे हेही स्पष्ट आहे. परंतु, दहीहंडीच्या प्रश्नावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांची हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवण्याची भूमिका मात्र विरोधक म्हणूनही त्यांचा शक्तिपात झाल्याचेच दर्शक आहे. आता दहीहंडीच्या दिवशी 20 फुटांपेक्षा जास्त हंडी फोडणाऱ्यांवर न्यायालयीन अवमानाची कारवाई होईल, हे नक्की. पण, हंडी न फोडता केवळ सलामी देऊन 9 थरांची उंची गाठणाऱ्यांचे काय होणार हेही लवकरच कळेल. परंतु, यात खेळले गेलेले तळाच्या थराचे राजकारण निश्चितच त्रासदायक आहे. आपल्या अनेक सणांचे, प्रथा-परंपरांचे काळानुरुप स्वरुप बदलण्याचे गरजेचे असताना आपले नेते नको ते बालहट्ट करत राजकीय लीला करत आहेत. न्यायालयाला यात दखल देण्यास स्वतःच भाग पाडत असून नंतर हक्कांवर अतिक्रमणाचा आरोप करत आहेत. असो, हे सर्व राजकारण होत असतानाच आता तरुण तुर्क, स्मार्ट म्हणवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधीच रया गेलेल्या त्यांच्या गृहखात्यामार्फत यातून ते कसा मार्ग काढतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा