हम ‘साथ’ ‘सात’ हैं

  Mumbai
  हम ‘साथ’ ‘सात’ हैं
  मुंबई  -  

  मुंबई - तुम्ही मागितले आम्ही दिले. विषय संपला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सर्वसामान्य मुंबईकर मतदार बहुतेक हेच म्हणत असावेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत कुणी सरशी साधली? या प्रश्नाचं उत्तर कुणी शिवसेना तर कुणी भाजपा असं देईल. पण हे झालं जागांच्या गणितांवर आधारलेलं समीकरण. मुंबईकर मतदारांनी खरा कौल दिला आहे तो राज ठाकरे यांना. 

  भाजपाच्या प्रचाराचा संपूर्ण भार स्वतःच्या खांद्यावर पेलून धरणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपापल्या पक्षाला बहुमत मिळावं म्हणून प्रचाराचं रान उठवलं. पण राज ठाकरे यांना फक्त सातच जागा हव्या होत्या आणि त्यांच्या पक्षाला त्या मिळाल्याही. असं काय करताय? मनसेच्या प्रचारगीतांचे शब्द आठवा. तुमच्या राजाला साथ द्या. खरंतर राज यांना मतदारांची साथ अपेक्षित होती. पण मतदारांनी ‘ध’ चा ‘मा’ च्या धर्तीवर ‘थ’ चा ‘त’ केला. म्हणजे राजाला ‘साथ’ ऐवजी ‘सात’ नगरसेवक दिले. 

  कोणत्याही घटनेवर व्यक्त होताना नेटीझन्सच्या प्रतिभेला बहर येतो. तसाच मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतही आला. राज ठाकरे यांच्या मनसेच्या सत्तावीस ते सात या घसरणीवर राजाला सात मिळाले ही कोटी मनसे अध्यक्षांच्या जखमेवर मिठ चोळणारी आहेच. ‘मुंबई लाइव्ह’ ला दिलेल्या मुलाखतीत आपल्याकडे गरुडाची तिक्ष्ण दृष्टी असल्याचा दावा करणारे राज ठाकरे यांच्या नजरेतून हे मेसेजेस सुटले असण्याची शक्यता नाही. 

  स्वतः उत्तम व्यंगचित्रकार असलेले राज ठाकरे कदाचित नाराज नाही व्हायचे. पण हिशेब मनात ठेवणार नाहीत, असं घडेल असं वाटत नाही. राज आता काय करतील? काही वर्षांपूर्वी आपल्याच एका सभेत राज म्हणाले होते,”मौका सबको मिलता हैं" यापुढे त्यांना मौका कधी मिळणार? या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत राज यांना त्यांना मिळालेल्या सात नगरसेवकांची साथ सुटू द्यायला नको.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.