Advertisement

संदीप देशपांडे विरोधात गुन्हा दाखल


संदीप देशपांडे विरोधात गुन्हा दाखल
SHARES

शिवाजीपार्क - "रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना मी जबाबदार आहे", असा फलक पालिका अभियंत्याच्या हातात देऊन फोटो काढणे आणि ते सोशल मिडियावर प्रसारीत करणे हे मनसे गटनेते संदीप देशपांडे यांना चांगलेच महागात पडले आहे.

शिवाजीपार्क पोलीस ठाण्यात मनसे गटनेता संदीप देशपांडे, नगरसेवक संतोष धुरी आणि इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे. संदीप देशपांडे यांनी आपली बदनामी केली आहे. देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यासाठी पालिकेचे अभियंते संजय दराडे यांनी लेखी तक्रार अर्ज शिवाजीपार्क पोलीस ठाण्यात दिला होता.

मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून सर्वच पक्षांकडून राजकारण सुरू असताना शहरातील रस्त्यांवर फक्त ३५ खड्डे असल्याचा जावईशोध पालिकेने लावला. यामुळे मनसेचे पालिका गटनेते संदीप देशपांडे यांनी दादरमधील न. ची. केळकर मार्गावर निदर्शने करत, रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांना मी जबाबदार आहे, असा फलक पालिकेचे अभियंता असलेल्या संजय दराडे यांच्या हातात दिले. या फलकासोबत दराडे यांचे फोटो काढून देशपांडे यांनी हे फोटो सोशल मिडीयावर प्रसारित केले होते. यामुळे पालिकेच्या सर्व अभियंत्यामध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

गुरुवारी 4200 अभियंत्यांनी पालिका आयुक्त अजोय मेहतांकडे राजीनामे सुपुर्द केले होते. मात्र आयुक्तांनी हे राजीनामे स्वीकारले नाहीत. मनसेचे गटनेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत कामावर परतणार नसल्याची भूमिका अभियंत्यांनी घेतली आहे. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या नगरसेवक आणि नेत्यांना मुंबईतील खड्ड्यांप्रकरणी अभियंत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.त्यामुळे शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून येत्या निवडणूकीपर्यत राजकारण तापण्याची शक्यता असून पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा