बावनकुळेंनी दिली भ्रष्टाचाराची कबुली

राज्य सरकारमधील उत्पादन शुल्क विभाग म्हणजे मलाईदार विभाग असा समज आहे. त्यामुळे या विभागामध्ये बदली करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची धडपड सुरू असते. या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी राळेगणसिद्धीमध्ये याबाबत कबुली दिली. समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी ही कबुली दिली. कर्मचारी-अधिकारी वर्गावर आर्थिक बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी आता खाजगी गुप्तहेरांची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती राळेगणसिध्दीमध्ये दिली होती. तसेच या गुप्तहेरांपासून कर्मचारी कामाला लागल्यापासून आतापर्यंत किती मालमत्ता जमा केली आहे? याची माहिती गोळा केली जाणार आहे. त्याचबरोबर भ्रष्टाचार करणाऱ्यांनी लिफाफा बंद करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

'मुंबई लाईव्ह'ने राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे यासंदर्भात विचारणा केली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, काही भ्रष्टाचार अधिकाऱ्यांमुळे अनधिकृतपणे मद्य विक्री काही भागात सुरू आहे. अशा अधिकाऱ्यांची तक्रार मिळालेली आहे. लवकरच अशा लोकांनी ही कामे बंद केली नाहीत तर अशा कर्मचाऱ्यांच्या मालमत्तांची माहिती गोळा केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मात्र त्यांनी राळेगणसिध्दीमध्ये खाजगी गुप्तहेरांची मदत घेणार काय? याबद्दल काही विचारले असता त्यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे, असे सांगितले.

या विभागातील कर्मचारी-अधिकारी वर्गाने वरकमाई बंद केली नाही, तर त्यांच्या मालमत्ता आणि आर्थिक बाबींबाबत चौकशी लावली जाईल, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'मुंबई लाईव्ह'ला दिली.

Loading Comments