Advertisement

राज ठाकरे मच्छिमारांच्या पाठिशी, समस्या सोडवा नाहीतर, काम बंद पाडू, मनसेचा इशारा

सोमवारी मनसेच्या शिष्टमंडळानं महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली आहे. या भेटीत शिष्टमंडळानं मच्छिमाराच्या मागण्या त्यांच्या समोर ठेवल्या. या मागण्यांवर लवकरात लवकर तोडगा काढला नाही, तर कोस्टल रोडचं काम बंद पाडू, असा इशारा दिला.

राज ठाकरे मच्छिमारांच्या पाठिशी, समस्या सोडवा नाहीतर, काम बंद पाडू, मनसेचा इशारा
SHARES

मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाला मच्छिमारांचा असलेला विरोध आता वाढतच चालला आहे. मच्छिमारांच्या पाठिशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता उभे ठाकले असून त्यांनी मच्छिमारांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यानुसार सोमवारी मनसेच्या शिष्टमंडळानं महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली आहे. या भेटीत शिष्टमंडळानं मच्छिमाराच्या मागण्या त्यांच्या समोर ठेवल्या. या मागण्यांवर लवकरात लवकर तोडगा काढला नाही, तर कोस्टल रोडचं काम बंद पाडू, असा इशारा यावेळी देण्यात आल्याची माहिती मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली आहे.


मच्छिमारांचा विरोध कशासाठी?

कोस्टल रोड प्रकल्पासाठी वरळी सीफेस, प्रियदर्शनी परिसरात समुद्रात भराव टाकण्यात येणार आहे. तर अनेक ठिकाणी पिलर उभारण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी हे काम होणार आहे तो समुद्रातील भाग माशांच्या प्रजननांचा अर्थात अधिकाधिक मासे मिळण्याचा भाग आहे. असं असताना हाच भाग नष्ट होणार असल्यानं मच्छिमारांना भविष्यात मासे मिळणार नाहीत नि त्यामुळं मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येईल, असं म्हणत अखिल मच्छिमार कृती संघटनेनं या प्रकल्पाला असलेला विरोध तीव्र केला आहे. गेल्या आठवड्यात वरळी कोळीवाड्यातील मच्छिमारांनी आंदोलन करत काम बंद पाडण्याचा प्रयत्नही केला होता.


डिझाईन बदला

मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येणार असल्यानं प्रकल्पाच्या डिझाईनमध्ये बदल करावा अशी मच्छिमारांची मागणी आहे. मात्र या मागणीकडे महापालिकेकडून कानाडोळा केला जात आहे. त्यामुळं या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे मच्छिमारांच्या पाठिशी उभे ठाकल्याचंही देशपांडे यांनी सांगितलं आहे. रविवारी राज ठाकरे यांनी वरळी कोळीवाड्यात जाऊन कामाची पाहणी करत मच्छिमारांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांचे सर्व प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं. या आश्वासनानुसार मनसेच्या शिष्टमंडळानं सोमवारी आयुक्तांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये मनसेचे नेते बाळा नांदगावकर, देशपाडे, संतोष धुरी यांच्यासह मच्छिमारांचा समावेश होता.


२ दिवसांत पाहणी

यावेळी आयुक्तांनी २ दिवसांत कोस्टल रोड प्रकल्पाची तांत्रिक समिती कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करेल. मच्छिमारांशी चर्चा करेल, असं आश्वासन दिलं. या आश्वासनानुसार येत्या आठवड्याभरात हा प्रश्न मार्गी नाही लागला नाही, तर कोस्टल रोडचं काम बंद पाडू, असा इशारा देशपांडे यांनी दिला आहे.



हेही वाचा-

कोस्टल रोडच्या भूमीपूजनात मुख्यमंत्र्यांना डावललं

कोस्टल रोडवरून राज ठाकरे आक्रमक; वरळीतील कोळी बांधवांची घेतली भेट



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा