Advertisement

मतदार यादीतील घोळामुळे गोंधळ


मतदार यादीतील घोळामुळे गोंधळ
SHARES

मुंबई - मतदानाचा दिवस मतदार यादीतील घोळानेच गाजला. मुंबईतील अनेक मतदार संघांमध्ये मतदार यादीतून मतदारांची नावेच गायब झाली. निवडणुकीत मतदान करणाऱ्या मतदारांची नावे या यादीत नसल्यामुळे मतदानासाठी घराबाहेर पडलेल्या मतदारांची नावे शोधताना एकच तारांबळ उडाली होती. याद्या मागून याद्या शोधल्या, कायकर्त्यांची टेबलं पालथी घातली तरीही नावंच न सापडल्यामुळे अखेर अनेकांना नाराज होत मतदान न करताच घरी परतावे लागले.

मुंबई महापालिकेच्या 227 नगरसेवक पदाच्या जागांसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मतदारांची घोर निराशा झाली. महापालिकेच्या 227 मतदारसंघांची फेररचना करताना अनेकांच्या सिमारेषा बदलल्या गेल्या. याचा फटका मतदानाच्या दिवशी मुंबईकरांना बसला.

मुंबईतील दादर शिवाजीपार्क परिसरातील पॉप्युलर निकेतन इमारतीतील सुमारे 25 कुटुंबांची नावेच मतदार यादीतून गायब झाली. तर, मानखुर्द म्हाडा कॉलनीतील अनेक मतदारांची नावेच मतदार यादीत नसल्यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे तेथील वातावरण बिघडल्यामुळे खुद्द डिसीपींसह सह पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी प्रभाग 135 मध्ये भेट देवून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु यामळे नागरिकांचे समाधान झाले नाही. चेंबूर, टिळकनगर, विक्रोळी, घाटकोपर, भांडुप, मुलुंडसह शहरात शिवडी, लालबाग, कुलाबा तसेच दहिसर, बोरीवली, मालाड, गोरेगाव, वांद्रे आदी भागांमध्ये मतदार यादीतून नावे गायब झाल्याचे प्रकार घडले होते. विधानसभा निवडणुकीत मतदान केल्यानंतरही या निवडणुकीत मतदारांची नावं या यादीत नव्हती. तर काही ठिकाणी नव्याने नोंदणी करण्यात आलेल्या मतदारांची नावे यादीत होती. परंतु त्यांच्या पालकांची नावे नव्हती. मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये सरासरी दहा ते वीस टक्के मतदारांची यादीच गायब असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. दरम्यान यादीतून सुमारे 12 लाख मतदारांची नावे गायब असल्याचे बोलले जात असून याप्रकरणी शिवसेनेच्या वतीने निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा