Advertisement

मुंबई महापालिका विभाजनाच्या मुद्यावर विधानसभेत गदारोळ


मुंबई महापालिका विभाजनाच्या मुद्यावर विधानसभेत गदारोळ
SHARES

मुंबई महापालिका सर्वच विभागांना न्याय देऊ शकत नसल्याने या महापालिकेचे तीन विभाग करावेत, अशी मागणी काँग्रेस आमदार नसिम खान यांनी विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे मांडली. त्यांच्या या विधानंतर सभागृहात गदारोळ पहायला मिळाला.


आशिष शेलार आक्रमक 

खान यांच्या भूमिकेला भाजपा आमदार आशिष शेलार यांनी तीव्र विरोध करत मुंबई मिळवण्यासाठी शेकडो हुतात्मा झाले आहेत, ही मागणी म्हणजे हुतात्म्यांचा अवमान, असल्याचं ते म्हणाले. दरम्यान सभागृहात गोंधळ सुरू असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी वाढत्या शहरांमुळे असं विभाजन करणं आवश्यक असल्याचं म्हणत खान यांच्या बाजूने भूमिक मांडली. यात काहीही वादाचा विषय नाही. मात्र याला वेगळं स्वरुप दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. पुणे महापालिका ही दोन विभागात आणण्याबाबत आम्ही विचार करत होतो, असंही पवार यांनी सभागृहात सांगितलं. दरम्यान वाढत्या गदारोळानंतर सभागृहाचं कामकाज अर्ध्यातासाठी तहकूब करण्यात आलं.


काँग्रेसचे अामदार नसीम खान यांनी मुंबईत घडलेल्या दुर्घटनेवरून मुंबई महानगरपालिकेचे तीन भागामध्ये विभाजन करण्याची मागणी केली. अाम्ही त्यांच्या मागणीस विरोध केला असून, त्याला शिवसेनेने देखील पाठींबा दिला. नसीम खान यांनी सदरची मागणी मागे घ्यावे, अशी मागणी केली. मुबंई महानगरपालिकेच्या विभाजनाच्या मागणीवरून यांच्या मनात मुंबईचे तुकडे करण्याचा डाव अाहे की काय अशी शंका निर्माण होते.

- आशिष शेलार, आमदार, भाजपा


काँग्रेसचे अामदार नसीम खान यांनी मुंबई महानगरपालिकेचे तीन भागामध्ये विभाजन करण्याची मागणी केली. अामचा आणि भाजपाचा त्यांच्या मागणीस विरोध असून याचा निषेध करतो. नसीम खान जोपर्यंत अापले सदरचे वक्तव्य मागे घेत नाहीत, तोपर्यंत अाम्ही त्यांना सभागृहात बोलू देणार नाही.

- सुनिल प्रभू, शिवसेना आमदार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा