Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब घेतले मुंबादेवीचे दर्शन

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक मुंबईचे कुलदैवत असणाऱ्या मुंबादेवीचे दर्शन घेतले. यावेळी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यादेखील उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब घेतले मुंबादेवीचे दर्शन
SHARES

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली धार्मिक स्थळ गुरूवार ७ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली. नवरात्रोत्सवाचा मुहुर्त साधत सर्व प्रार्थना स्थळांची दार उघडण्यात आली. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक मुंबईचे कुलदैवत असणाऱ्या मुंबादेवीचे दर्शन घेतले. यावेळी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यादेखील उपस्थित होत्या.

दीड वर्षानंतर अखेर महाराष्ट्रातील राज्य सरकारच्या परवानगीने घटस्थापनेच्या मुहूर्तावर गुरुवारपासून भाविकांसाठी मुंबईसह राज्यातील मंदिरे खुली करण्यात आली आहेत. राज्यातील महत्त्वाच्या मंदिरांमध्ये राज्याच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांनी पहाटेच जाऊन मंदिरे खुली करत दर्शन घेतले आहे.

कोरोनाच्या काळात सश्रद्ध माणसांना आधार आणि जगण्याचे मानसिक बळ दिले असे मानणाऱ्या भाविकांसाठी राज्यातील मंदिरे, प्रार्थनास्थळे खुली करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील मुंबादेवी मंदिरात जाऊन मुख्यमंत्र्यांनी दर्शन घेतले. गुरुवारी पहाटे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

राज्याचे परळी वैजनाथ या १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमदार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पहाटेच मंदिरात जाऊन मंदिराचे दरवाजे उघडत सर्व प्रथम दर्शन घेतले.

घटस्थापनेपासून राज्यातील सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसांपासूनच मंदिरांमध्ये भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने मंदिर प्रशासनाने गर्दीच्या व्यवस्थापनाची तयारी केली आहे.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशातून गर्दी टाळण्यासाठी बंद असलेली मंदिरे गुरुवारपासून खुली होत असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील सिद्धिविनायक, महालक्ष्मी आणि मुंबादेवी मंदिर प्रशासनाने सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जात आहे. दर्शनासाठी गर्दी होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाने भाविकांना ऑनलाइन पूर्वनोंदणीचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा