Advertisement

सत्ताधारी पक्षांच्या मुख्य प्रतोदांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा


सत्ताधारी पक्षांच्या मुख्य प्रतोदांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा
SHARES

सत्ताधारी पक्षांच्या मुख्य प्रतोदांना आता लाल दिवा मिळणार आहे. विरोधी पक्ष बाकावर नसताना सत्ताधारी पक्षाने विधानसभेत महत्त्वाचे विधेयक मंजूर केले. बुधवारी मंजूर झालेल्या विधेयकानुसार सत्ताधारी पक्षांच्या मुख्य प्रतोदांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात येणार आहे त्यामुळे त्यांना आता लाल दिवा आणि बंगलाही मिळणार आहे. एका बाजूला विरोधी पक्षांनी शेतकरी कर्जमाफी आणि आमदारांचे निलंबन या मागणीसाठी सभात्यागाचा मार्ग अवलंबला आहे. सत्ताधारी पक्षाने बहुमताच्या जोरावर विधानसभेमध्ये हे विधेयक मंजूर केले आहे.

मंत्री बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेले भाजपाचे जेष्ठ आमदार आणि मुख्य प्रतोद राज पुरोहित यांची इच्छा भाजपाने काही अंशी पूर्ण केली. या विधेयकामुळे भाजपाचे राज पुरोहित आणि भाई गिरकर यांना लाल दिवा मिळणार आहे तर शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे आणि सुनील प्रभू यांनाही लाल दिव्याची गाडी मिळणार आहे.

शिवसेना सत्तेमध्ये घटक पक्ष आहे. कदाचित त्यांना शांत करण्यासाठी भाजपाने हे केले आहे. महत्त्वाचे विधेयक आणताना सत्ताधारी पक्षांनी सभागृहामध्ये चर्चा घडवून आणणे गरजेचे आहे. या सगळ्याची गरजच काय होती? शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाही तर दुसरीकडे यांना सरकारी बंगले, सुविधा देऊन सरकारच्या तिजोरीवर ताण का दिला जात आहे? 

- भाई जगताप, मुख्य प्रतोद, काँग्रेस

यासंदर्भात शिवसेनेच्या मुख्य प्रतोद नीलम गोऱ्हे आणि भाजपाचे मुख्य प्रतोद राज पुरोहित यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर भाजपाचे विधान परिषदेचे मुख्य प्रतोद भाई गिरकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की अद्याप त्यांनी विधेयक पाहिलेले नाही. शिवाय विधान परिषदेमध्येही हे विधेयक मंजूर होणे गरजेचे आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा