Advertisement

मुख्यमंत्र्यांची 'अस्मिता', ५० मुलींच्या सॅनिटरी नॅपकिनसाठी दिली स्पॉन्सरशिप


मुख्यमंत्र्यांची 'अस्मिता', ५० मुलींच्या सॅनिटरी नॅपकिनसाठी दिली स्पॉन्सरशिप
SHARES

ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना फक्त ५ रुपयांमध्ये ८ सॅनिटरी नॅपकिन देण्याची योजना ग्रामविकास विभागाअंतर्गत उमेद अभियानामार्फत राबविली जाणार आहे. या योजनेचा लोगो, योजनेच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेले मोबाईल अॅप आणि डिजिटल अस्मिता कार्ड यांचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले. महिला दिनापासून म्हणजे ८ मार्चपासून अस्मिता योजना सुरू करण्यात येणार आहे. यावेळी अस्मिता फंडाचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.


मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

अस्मिता स्पॉन्सर या निधीतून ग्रामीण भागातील मुलींना सॅनिटरी नॅपकिन मिळण्यासाठी लोकसहभागातून मदत उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी अस्मिता फंडाचा शुभारंभ करताना ५० मुलींना १२ महिने सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करुन देण्यासाठी ऑनलाईनद्वारे रक्कम भरून या ५० मुलींची अस्मिता स्पॉन्सरशिप स्वीकारली. अस्मिता स्पॉन्सरशीप स्वीकारणारे मुख्यमंत्री फडणवीस हे पहिले ठरले आहेत. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी १५१ मुलींना १२ महिने सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करण्यासाठी ऑनलाईन रक्कम वर्ग करुन या १५१ मुलींची अस्मिता स्पॉन्सरशीप स्वीकारली आहे.


महिलांना माफक दरात सॅनिटरी पॅड

अस्मिता योजनेतून ग्रामीण भागातील महिलांनाही माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. महिलांना २४० मिमि.च्या ८ पॅडचे एक पाकिट २४ रुपयांना तर २८० मिमि.च्या ८ पॅडचे एक पाकिट २९ रुपयांना उपलब्ध होणार आहे. बचतगट हे वितरकांकडून सॅनिटरी नॅपकिनचे पाकिट खरेदी करून परस्पर विक्री करणार आहेत.


मोबाईल अॅप, डिजिटल अस्मिता कार्ड यांच्या माध्यमातून या योजनेत पूर्ण पारदर्शकता राखली जाणार असून योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. लोकांनी अस्मिता फंडाला सहयोग करून अस्मिता स्पॉन्सर व्हावे.
- पंकजा मुंडे, महिला व बालविकास तसेच ग्रामविकास मंत्री

गिरगावमध्येही सॅनिटरी नॅपकिन्स डिस्पोजल मशीन

गिरगावातील महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स डिस्पोजल मशीन बसवण्यात यावी, या मागणीसाठी 'आम्ही गिरगावकर' या ग्रूपने पुढाकार घेतला आहे. क्राउड फंडिंगच्या माध्यमातून त्यांनी मदतही जमा केली आहे. पालिकेची परवानगी मिळताच ‘आम्ही गिरगावकर’ टीम गिरगावात ही मशिन बसवणार आहे. भीमाबाई राणे या शाळेच्या गेटजवळ ही मशीन बसवण्यात येणार आहे. जेणेकरुन तिथून प्रवास करणाऱ्या महिलांना, विद्यार्थींनीना त्या मशीनचा उपयोग करता येऊ शकेल, असे ‘आम्ही गिरगावकर’च्या महिला सचिव शिल्पा नाईक यांनी सांगितले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा