भाजपाचे 'पोस्टरबॉय'!

 Mumbai
भाजपाचे 'पोस्टरबॉय'!

दादर - मुंबई महापालिका निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु झाली असून, प्रचार सभांमधून भाजपाकडून आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. परंतु आता भाजपाकडून विकास कामे आणि आश्वासनांची होर्डिंगद्वारे पोस्टरबाजी सुरु आहे. मुंबईत ठिकठिकाणी भाजपाच्यावतीने लावण्यात आलेल्या या होर्डिंगवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'हा माझा शब्द आहे' असे ठासून सांगताना दिसत आहेत. भाजपाच्या या प्रचारबाजीत मुख्यमंत्री पोस्टरबॉयच्या भूमिकेत दिसून येत आहेत.

मुंबई पालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपा पक्षांच्या वतीने मतदारांना आकर्षित करण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. 'छत्रपतींच्या आशीर्वादाचा प्रभाव दिसणारच, कमळ फ़ुलणारच, परिवर्तन तर होणारच' अशा प्रकारच्या परिवर्तनाच्या जाहिराती वृत्तपत्रातून तसेच होर्डिंगमधून प्रदर्शित केल्या जात आहेत. पण वृत्तपात्रातील जाहिराती असोत वा होर्डिंगवरील जाहिराती असोत सर्वठिकाणी मुख्यमंत्री यांचीच छबी सगळीकडे पाहायला मिळत आहेत. 'पूर्ण बहुमत, संपूर्ण विकास', 'पारदर्शक कारभार हा माझा शब्द आहे '; 'परिवर्तन तर होणारच' अशा एका ना अनेक जाहीरातींमधून मुख्यमंत्री मुंबईकरांना भाजपाचा अजेंडा पटवून देत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाच्या प्रचाराची संपूर्ण धुरा सांभाळलेली आहे. मुंबई महापलिकची विकास कामे, येथील भ्रष्टाचार तसेच आपली सत्ता आल्यास कशाप्रकारे पारदर्शक कामे केली जातील याची ग्वाही मुख्यमंत्री यांनी दिली आहे. एकूणच महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची पोस्टरबाजी जोरात सुरू आहे.

Loading Comments