Advertisement

आता, मुख्यमंत्र्यांनीही थोडं फिरायला हवं, अखेर शरद पवारच बोलले

घरात बसून काम करायला हरकत नाही. परंतु राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता थोडं फिरायलाही हवं, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर दिला आहे.

आता, मुख्यमंत्र्यांनीही थोडं फिरायला हवं, अखेर शरद पवारच बोलले
SHARES

घरात बसून काम करायला हरकत नाही. परंतु राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता थोडं फिरायलाही हवं, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना  घरचा आहेर दिला आहे. राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत, एक मुख्यमंत्री मातोश्रीत बसून काम करतात, तर दुसरे राज्यात फिरत असतात, अशी टीका नुकतीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. (cm uddhav thackeray must come out of home says ncp chief sharad pawar in interview)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच सामनाला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांना भलेही विरोधक महाविकास आघाडी सरकारला तीनचाकी रिक्षा म्हणून हिणावत असले, तरी त्याचं स्टिअरिंग माझ्या हाती आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक जुना फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला. या फोटोत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एका गाडीत बसलेले असून त्या गाडीचं स्टिअरिंग उपमुख्यमंत्र्यांच्या हाती असलेलं दिसत आहे. हा सूचक फोटो सध्याच्या सरकारवर कोणाचा वचक आहे, हे दर्शवत असल्याची टीका विरोधकांनी सुरू केली. 

सोबतच रिक्षाचं स्टिअरिंग चालकाच्या हाती असलं, तरी मागे बसलेली सवारीच कुठं जायचं हे ठरवते, असं म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा टोला हाणला. 

हेही वाचा- पुढच्या निवडणुकाही एकत्रित लढू- शरद पवार

कोरोना संकटाच्या काळातसुद्धा मुख्यमंत्री मातोश्रीबाहेर पडत नसल्याची टीका सातत्याने विरोधकांकडून होत असताना शरद पवार पहिल्यांदा या मुद्द्यावर व्यक्त झाले आहेत. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, मागील भाजप सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एकांगी कामामुळे महाविकास आघाडी सरकारला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली. हे सरकार शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन बनवलेलं सरकार आहे. सरकार स्थापण्याच्या सर्व शक्यता तपासल्यानंतरच या सरकारचं नेतृत्व शिवसेनेच्या हाती देण्यावर एकमत झालं. त्यामुळे या सरकारचा रिमोट कंट्रोल हा माझ्या हाती नाही.

सरकारच्या बाबतीतले सर्व धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेत असले, तरी निर्णय घेताना ते सर्व सहकाऱ्यांनाही विश्वासात घेऊन काम करत आहे. त्यांनी एका ठिकाणी बसून काम करण्यात काहीच हरकत नाही. परंतु सध्याच्या स्थितीत त्यांनी थोडं फिरायलाही हवं. सोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही जास्तीत जास्त बाहेर जाऊन काम करण्याची गरज आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजनाची जबाबदारी असल्याने त्यांनी मंत्रालयातूनच कारभार बघणं गरजेचं असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

सत्ता नसल्याने देवेंद्र फडणवीस कमालीचे अस्वस्थ झाले असून त्यांना सरकार पाडण्याची घाई झाली आहे. परंतु इतर कुठलाही नवा पर्याय नसल्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार ५ वर्षे पूर्ण करेल. सध्याच्या स्थितीत कुणालाही निवडणुका नकोय, याकडेही शरद पवार यांनी लक्ष वेधलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा