Advertisement

गरीबांना बुलेट ट्रेन नाही, तर रिक्षाच परवडते, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे तीन चाकी रिक्षा असल्याची शेलकी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते ​देवेंद्र फडणवीस​​​ यांनी केली होती.

गरीबांना बुलेट ट्रेन नाही, तर रिक्षाच परवडते, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
SHARES

महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे तीन चाकी रिक्षा असल्याची शेलकी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याला उत्तर देताना गरीबांना बुलेट ट्रेन नाही, तर रिक्षाच परवडत असल्याची पलटवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

नागपूर हिवाळी अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. निवडणुकीआधी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्तेच्या लालसेपोटी एकत्र आल्याचं म्हणत फडणवीस यांनी सामनातील जुने अग्रलेख वाचून दाखवले होते. काँग्रेससोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करणार असा बाळासाहेबांना शब्द दिला होता का? असा प्रश्न विचारून फडणवीस यांनी शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. 

हेही वाचा- कितीही चिखल करा, कमळ फुलू देणार नाही, पहिल्याच भाषणात आदित्य ठाकरेंचा घणाघात

या सर्व टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही दिलेला शब्द सोयीस्कररित्या विसरत नाही. काँग्रेससोबत मिळून सरकार स्थापन करू, असा शब्द मी नक्कीच दिला नव्हता. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी कुठलंही टोक गाठेन, हा शब्द मी दिला होता आणि हा शब्द मी पाळला आहे. फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारला तीन चाकी रिक्षा असं हिणवलं होतं. परंतु गरिबांना बुलेट ट्रेनचं तिकीट नाही, तर तीन चाकी रिक्षाच परवडते. हे त्रिशंकू सरकार नाही. आम्ही तिन्ही पक्ष मनाने एकत्र आल्याचं ठाकरे यांनी फडणीसांना सांगितलं.

हेही वाचा- शिवसेनेकडून जीवाला धोका : किरीट सोमय्या

सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. त्याचा मुख्यमंत्र्यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला. चहापेक्षा किटली गरम असं म्हणतात, पण इथं किटली पुसणारी फडकी कधीपासून गरम होऊ लागली? असा प्रश्न विचारत सुधीर नका होऊ अधीर, तुम्ही झाले बेकार, म्हणून तुम्हाला वाटते अजब सरकार… अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी कोपरखळी मारली.

ट्रेड मिलवर चालणाऱ्यांना वाटतं की आपण खूप चाललो. पण तो असतो तिथंच. गेले काही दिवस काहींना असंच वाटत होतं. पण आमचं तसं होणार नाही. कमी बोलायचं आणि जास्त काम करायचं हे आमच्या सरकारचं धोरण आहे. हे स्थगितीचं नाही, तर प्रगतीचं सरकार आहे. आम्ही शेतकऱ्यांना शब्द दिला आहे. त्यानुसार त्यांचं कर्ज नक्कीच माफ करणार, असंही ठाकरे म्हणाले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा