Advertisement

विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी लाड विरुद्ध माने


विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी लाड विरुद्ध माने
SHARES

येत्या 7 डिसेंबरला होणाऱ्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे दिलीप माने यांच्यात लढत होणार असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी दोन्ही उमेदवारांनी अर्ज कायम ठेवल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे आता मानेंच्या मदतीला अदृश्य 'बाण' येतात की पुन्हा भाजपाला अदृश्य 'हात' मदत करतात, हे पहावे लागणार आहे.


लाड यांचे पारडे जड

शिवसेनेने पाठिंबा दिल्याने भाजपा उमेदवार प्रसाद लाड यांचे पारडे जड झाले आहे. त्यामुळे जिंकण्यासाठी माने यांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. दरम्यान, जिंकण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार दिलीप माने चमत्कार करणार का? हे निकाल लागल्यावर स्पष्ट होईल.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता. भाजपाचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे दिलीप माने या दोन्ही उमेदवारांनी अर्ज कायम ठेवल्याने निवडणूक अटळ आहे. सध्या विधानसभेत भाजपाचे १२२, शिवसेनेचे ६३, काँग्रेसचे ४२, राष्ट्रवादी ४१, शेकाप आणि बहुजन विकास आघाडीचे प्रत्येकी ३, अपक्ष ७, एमआयएमचे २ तर; सपा, रासपा, मनसे आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे प्रत्येकी एक आमदार आहेत. उमेदवाराला जिंकण्यासाठी १४५ आकडा पार करावा लागणार आहे.


भाजपाच्या प्रसाद लाड यांना शिवसेनेचा पाठिंबा

शिवसेनेने भाजपच्या प्रसाद लाड यांना पाठिंबा दिल्यामुळे प्रसाद लाड यांचा विजय निश्चित मानला जात आहे. भाजपाचे १२२ आणि शिवसेनेच्या ६३ मतांसह प्रसाद लाड यांच्या पारड्यात सध्या १८५ मते दिसत आहेत. शिवाय अपक्ष २० मतेही प्रसाद लाड यांच्याकडेच वळण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतात. त्यामुळे दिलीप मानेंचा पराभव स्पष्ट दिसत आहे. त्यातच काँग्रेस राष्ट्रवादीची मिळून ८३ मतं होतात. मात्र, राणेपुत्र आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे आणि समर्थक आमदार कालिदास कोळंबकर हे काँग्रेस उमेदवाराला मतदान करतील का? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. त्याबरोबर राष्ट्रवादीने निलंबित केलेले आमदार रमेश कदम यांचे मतही भाजपाच्या पारड्यात जाणार का? हे पहावे लागेल.


यावेळात होणार मतदान

गुरुवारी ७ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत मतदान होणार आहे. त्याचदिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.


विधानसभेचे पक्षीय संख्याबळ

 • भाजपा - १२२
 • शिवसेना- ६३
 • काँग्रेस- ४२
 • राष्ट्रवादी- ४१
 • शेकाप- ३
 • बविआ- ३
 • एमआयएम - २
 • अपक्ष- ७
 • सपा- १
 • मनसे- १
 • रासप- १
 • कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया - १


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा