Advertisement

नागरिकत्व कायद्याविरोधात काँग्रेसचा फ्लॅग मार्च

'भारत बचाओ - संविधान बचाओ' फ्लॅग मार्चचं मुंबईत आयोजन करण्यात आलं आहे.

नागरिकत्व कायद्याविरोधात काँग्रेसचा फ्लॅग मार्च
SHARES

'भारत बचाओ - संविधान बचाओ' फ्लॅग मार्चचं मुंबईत आयोजन करण्यात आलं आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीनं भाजप सरकारविरोधात या मार्चचं आयोजन केलं आहे. २८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळक पुतळ्यापर्यंत फ्लॅग मार्च काढण्यात येणार आहे. लोकशाहीवादी धर्मनिरपेक्ष संघटना व कार्यकर्त्यांनी तसंच नागरिकांना मोठ्या संख्येनं या फ्लॅग मार्चमध्ये सहभागी होण्याचं आवाहन प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.

काँग्रेसची स्थापना

'२८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईत काँग्रेसची स्थापना झाली होती. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात धर्मभेद, वंशभेद, प्रांतभेद इ. भेदांवर मात करणारी अखिल भारतीय एकराष्ट्रीयता निर्माण करणं हे सूत्र ठरवण्यात आली. याच सूत्रावर काम करत काँग्रेसनं स्वातंत्र्यचळवळ उभी केली, लोकमान्य टिळक, राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली अहिंसक मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली देशाचं संविधान तयार झालं', असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.

'या संविधानानुसार आपला देश चालतो आहे. पण आज केंद्रातील भाजप सरकारच्या लोकशाहीविरोधी आणि संविधानविरोधी कार्यपद्धतीनं देशात धार्मिक आणि सामाजिक फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. देशाची लोकशाही, संविधान, व्यक्तीस्वातंत्र्य, राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव यावर केंद्र सरकारनं आघात केला असल्याचा आरोप त्यांनी केला. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी या देशात 'फोडा आणि राज्य करा' हे धोरण राबवलं होतं. तीच परिस्थिती भाजपचे केंद्र सरकार पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळं पुन्हा एकदा भाजप सरकारविरोधात स्वातंत्र्यलढ्याप्रमाणं लढा उभारावा लागणार आहे.’

आवाज दाबण्याचा प्रयत्न 

केंद्र सरकार सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असून, याचाच निषेध करण्यासाठी व तरुण, विद्यार्थी व जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीनं काँग्रेस स्थापना दिनी २८ डिसेंबरला ऑगस्ट क्रांती मैदान इथं ध्वजारोहण करून ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटी असा 'भारत बचाओ, संविधान बचाओ' फ्लॅग मार्च काढण्यात येणार आहे.

फ्लॅग मार्च

राज्यभरातही विविध ठिकाणी फ्लॅग मार्च काढण्यात येणार आहेत. हजारो काँग्रेस कार्यकर्ते या फ्लॅग मार्चमध्ये सहभागी होणार आहेत. लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं या फ्लॅग मार्चमध्ये सहभागी व्हावं, असं आवाहन थोरात यांनी केलं आहे.



हेही वाचा -

नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या समर्थनार्थ संविधान सन्मान मार्च

नागरिकत्व कायदा हिंदूच्याही विरोधातील - प्रकाश आंबेडकर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा