भाजपाने सत्ता आणि सरकार दोन्ही सोडावे - एकनाथ गायकवाड

 Dadar East
भाजपाने सत्ता आणि सरकार दोन्ही सोडावे - एकनाथ गायकवाड

देशात दलितांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराविरोधात मुंबई काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने शनिवारी दादरच्या रेल्वे स्थानकाबाहेरील स्वामी नारायण मंदिरासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी महाराष्ट्रातील बुलढाणा येथील दलित महिलेची नग्न धिंड काढून माणुसकीला काळिमा फासणाऱ्या नराधमांचा जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी काँग्रेसचे नेते एकनाथ गायकवाड यांनी रोहित वेमुला याची हत्या करण्यात आली, असा आरोप केला. 'आरएसएस' ही दलित विरोधी संघटना असल्याचेही ते म्हणाले. 'आरएसएस'चा स्वातंत्र्य लढ्याशी काहीही संबंध नव्हता. त्यांनी कोणत्याही प्रकारे समाज सुधारणेत हातभार लावलेला नाही. सध्या भाजपाचे वागणे म्हणजे 'गाई वाचवा, पण बाई नाचवा' अशा प्रकारचे असल्याची घणाघाती टीकाही गायकवाड यांनी केली. 

मोदींना गरीब जनतेसाठी वेळ नाही. त्यांना परदेश दौऱ्यांसाठी वेळ आहे. महाराष्ट्र सरकारला सामाजिक भान नाही म्हणून शेतकरी आंदोलन करत आहेत. मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्रीपद असूनसुद्धा महिलांना अशी वागणूक दिली जाते. नग्न धिंड काढलेल्या महिलेला अजून न्याय मिळाला नाही. भाजपा सरकारला सत्ता चालवता येत नसेल तर, त्यांनी सत्ता आणि सरकार दोन्ही सोडावे, सत्ता आम्ही चालवू. असे आव्हानही त्यांनी यावेळी भाजपाला दिले. बुलढण्यातील महिलेला न्याय मिळाला नाही तर, प्रत्येक गावात निदर्शने करणार असल्याचा इशारा देखील गायकवाड यांनी सरकारला दिला.

 

Loading Comments