Advertisement

“हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य, भाजपमधील काही नेते टेन्शनमध्ये आले असतील”

भाजपच्या महिला आघाडीकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. यावरून काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजप नेत्यांना कोपरखळी मारली आहे.

“हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य, भाजपमधील काही नेते टेन्शनमध्ये आले असतील”
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) यांच्या दुसऱ्या पत्नीचं प्रकरण गाजत असताना भाजपच्या महिला आघाडीकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. यावरून काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजप नेत्यांना कोपरखळी मारली आहे.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दोन पत्नी असल्याचं कबूल केलं आहे. हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत आणि त्याला न्यायही नाही. धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा भाजप (bjp) महिला मोर्चाच्या उमा खापरे यांनी दिला आहे.

सामाजिक न्याय खात्यासारख्या अतिमहत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आपण गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर टाकलेली आहे. वरील घटनेमुळे निश्चितच समाजावर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. वस्तुस्थितीचं गांभीर्य ओळखून आपण कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा, असं पत्र उमा खापरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.

हेही वाचा- धनंजय मुंडेंनी दुसऱ्या लग्नाची माहिती लपवली'; भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार

त्यावर टोमणा मारताना, हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य या #भाजपा महिला आघाडीच्या मागणीनंतर #भाजपा तील काही नेते टेंशनमध्ये आले असतील, असं ट्विट सचिन सावंत यांनी केलं आहे.

दरम्यान मुख्यमंत्री बंगले लपवतात, तर त्यांचे मंत्री बायको लपवतात, असं वक्तव्य करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे. 

आपल्या दोन्ही पत्नींच्या नावे मालमत्ता खरेदी केल्याची तसंच दुसऱ्या पत्नीपासून झालेल्या मुलांना आपलं नाव दिल्याची जाहीर कबुली देखील त्यांनी दिली आहे. रेणू शर्मा यांच्यासोबत परस्पर सहमतीने संबंध असल्याचंही त्यांनी मान्य केलं आहे. तरीही त्यांनी आॅक्टोबर २०१९ मध्ये निवडणुकीच्या शपथपत्रात आपल्या दोन्ही पत्नी, मुलं आणि त्यांच्या नावे करण्यात आलेली मालमत्ता याबाबतची माहिती लपवली. या सर्व प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

(congress leader sachin sawant criticises bjp over demanding resignation of dhananjay munde)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement