Advertisement

‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याला निवडणुकीचं तिकीट मिळणं दुर्दैवी

बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाकडून तिकीट देण्यात येणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्यावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी कडाडून टीका केली आहे.

‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याला निवडणुकीचं तिकीट मिळणं दुर्दैवी
SHARES

निवडणूक आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाकडून तिकीट देण्यात येणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्यावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी कडाडून टीका केली आहे. (congress leader sachin sawant criticises devendra fadnavis for gupteshwar pandey gets ticket in bihar election)

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून केलेल्या ट्विटमध्ये सावंत यांनी म्हटलं आहे की, देवेंद्र फडणवीसजी बिहार भाजपाचे प्रभारी असताना जर मुंबई पोलिसांचा अपमान करुन महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या @ips_gupteshwar ना भाजपाचा सहयोगी पक्ष तिकीट देत असेल तर ते अत्यंत दुःखद असेल. फडणवीसजींनी निकराने विरोध केला नाही तर महाराष्ट्रात जनतेच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागेल, असं सचिन सावंत यांनी नमूद केलं आहे. देवेंद्र फडणवीस हे बिहारचे प्रभारी असून बिहारमध्ये भाजप आणि जेडीयू एकत्रित मिळून विधानसभा निवडणूक लढवत आहेत.

हेही वाचा - राजकारणात जाण्यासाठीच ‘त्यांच्या’कडून महाराष्ट्राची बदनामी- संजय राऊत

तत्पूर्वी, बिहार विधानसभा निवडणुका तोंडावर असताना बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच घेतलेली स्वेच्छानिवृत्ती चांगलीच चर्चेत आली होती. त्यावर भाष्य करताना बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सातत्याने महाराष्ट्र आणि पोलिसांवर टीका केली. राजीनामा देऊन पांडे बिहार विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ते सर्वांनाच अपेक्षित होतं. राजीनामा देण्याची ही त्यांची पहिली वेळ नाहीय. जे लोक महाराष्ट्राला बदनाम करत आहेत ते राजकारणात जात आहेत. हा प्रकार महाराष्ट्राला सुनियोजीतपणे बदनाम करण्यासाठीच असल्याचा, दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला होता.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि महाराष्ट्राला बदनाम करायचं सुनियोजित षडयंत्र रचलं जात आहे. जे, महाराष्ट्र, मुंबईबद्दल बोलताहेत त्यांचं पुढचं पाऊल राजकारणात पडत आहे. त्यासाठी ते महाराष्ट्र, मुंबईला पायपुसणं म्हणून वापरत असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला होता. 

हेही वाचा - बिहारमध्ये कोरोना संपलाय का? संजय राऊत यांचा संतप्त सवाल


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा