तिकिटासाठी किती पक्ष फिराल?

  Ghatkopar
  तिकिटासाठी किती पक्ष फिराल?
  मुंबई  -  

  घाटकोपर - निवडणुका जवळ आल्यावर तिकिटांसाठी होणारी पक्षांतरं ही काही नवी नाही. मात्र घाटकोपरच्या एका उमेदवाराने मात्र कळसच केलाय. त्यामुळे या उमेदवाराला नक्की कोणत्या पक्षाचं म्हणायचं हा सुद्धा प्रश्न पडलाय.

  राष्ट्रवादीकडून नकार

  घाटकोपरच्या प्रतिक्षा घुगे या तशा मूळच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका. 2012ची मुंबई महानगरपालिका निवडणूक त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवली. मात्र पक्षांतर्गत विरोधामुळे यंदा राष्ट्रवादीतून तिकीट मिळणार नाही याची खात्री पटल्यानंतर प्रतिक्षा घुगेंनी थेट भाजपाकडे मोर्चा वळवला.

  भाजप आणि सेनेकडूनही निराशा

  भाजपमध्येही पक्षाचे जुने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे त्यांना तिकीट देण्यास मोठा विरोध होऊ लागला. भाजपचं तिकीट मिळणार नाही असं लक्षात येताच त्यांनी शिवसेनेकडे मोर्चा वळवला. शिवसेनेतून उमेदवारी मिळण्याचं आश्वासनही मिळालं. इतकंच काय, त्यांना एबी फॉर्मही देण्यात आले. पण ऐनवेळी फॉर्ममधल्या तांत्रिक अडचणींचं कारण पुढे करत त्यांना दिलेला फॉर्म परत घेण्यात आला.

  शेवटी काँग्रेसनेच दिला हात

  शेवटी राष्ट्रवादी, भाजपा आणि शिवसेना झाल्यानंतर प्रतिक्षा घुगेंनी काँग्रेसकडे तिकीटाची मागणी केली. इथे मात्र त्यांना तिकीट देण्यात आलं. काँग्रेसचे एबी फॉर्म घेऊन त्यांनी उमेदवारी अर्जही भरला. सरतेशेवटी त्या प्रचाराच्या तयारीला लागल्या. इथे मात्र थेट निवडणूक आयोगानंच त्यांचा अर्ज रद्द ठरवला.

  उमेदवारी मिळूनही निवडणूक नाही?

  प्रतिक्षा घुगेंनी अर्जासोबत प्रतिज्ञापत्रच सादर न केल्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला. यावर प्रतिक्षा घुगेंनी जोरदार आक्षेप घेतलाय. 'माझा उमेदवारी अर्ज हेतुपुरस्सर बाद केला आहे. उमेदवारी अर्ज रद्द करण्याचं षड्यंत्र केलं गेलं आहे. त्यामुळे कोर्टात जाणार आहे', अशा शब्दांत प्रतिक्षा घुगे यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. मात्र तूर्तास तरी प्रतिज्ञापत्राच्या तांत्रिक अडचणीमुळे घुगेंचा अर्ज रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे इतक्या पक्षांशी वाटाघाटी करूनही घुगेंच्या निवडणूक लढवण्यावर अजूनही प्रश्नचिन्हच आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.